मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा सिद्धार्थ जाधव नेहमी चर्चेत असतो. सध्या सिद्धार्थ जाधव ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘आता होऊ दे धिंगाणा ३’मध्ये पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमात सिद्धार्थ सूत्रसंचालनाची भूमिका निभावत आहे. आज ‘आता होऊ दे धिंगाणा’चा १००वा भाग प्रसारित होणार आहे. त्यानिमित्ताने सिद्धार्थ जाधवने खास पोस्ट लिहिली आहे.
अभिनेता सिद्धार्थ जाधवने ‘आता होऊ दे धिंगाणा ३’ कार्यक्रमाच्या मंचावरील दोन फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत लिहिलं आहे, “काय आणि कसे आभार मानू ‘स्टार प्रवाह’ टीमचे…मला कळतं नाही…’आता होऊ दे धिंगाणा’चा शंभरावा एपिसोड…बापरे मी या कार्यक्रमाचा भाग होईन किंवा हा कार्यक्रम मला होस्ट करायला मिळेल आणि महाराष्ट्राचे मायबाप रसिक प्रेक्षक एवढं प्रेम करतील हे कधीच वाटलं नव्हतं…मी खूप वेळा पाहायचो की, या मालिकेने शंभर भाग पूर्ण केले…या मालिकेने २०० भाग पूर्ण केले…या मालिकेने ३०० भाग पूर्ण केले. पण आता मी त्या एका कार्यक्रमाचा भाग आहे ज्यांनी शंभर एपिसोड पूर्ण केले.”
“हा एक कथाबाह्य कार्यक्रम आहे आणि गेले तीन वर्ष मी हा शो होस्ट करतोय. पण याचं सगळंच श्रेय आहे सतीश राजवाडे सर, श्रीप्रसाद क्षीरसागर, सुमेध, चिन्मय, अद्वैत दादा, निखिल, दीप सर, स्टार प्रवाह, फ्रेम्स कंपनी आणि ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या संपूर्ण टीमला जातं …बापरे शब्दात मांडू शकणार नाही असा हा विषय आहे…पण येस…मी पण अशा एका कलाकृतीचा भाग आहे ज्यांनी शंभर एपिसोड पूर्ण केलेत आणि हे शक्य झाले तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे…सो थँक्यू . असंच प्रेम ठेवा आणि खूप भारी फिलिंग आहे…खरं सांगतो. खूप भारी फिलिंग आहे…लव्ह यू ऑल…पाहायला विसरु नका ..आता होऊ दे धिंगाणा ३,” अशी सुंदर पोस्ट सिद्धार्थ जाधवने लिहिली आहे.
हेही वाचा – Video: पापाराझींनी आवाजात देताच राहाची ‘ती’ कृती; आलिया-रणबीर लेकीला पाहून लागले हसायला
दरम्यान, सिद्धार्थ जाधवचा ‘आता होऊ दे धिंगाणा’ कार्यक्रम दर शनिवार-रविवार रात्री ९ वाजता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर प्रसारित होतो. १००व्या भागानिमित्ताने ‘आता होऊ दे धिंगाणा ३’मध्ये सोशल मीडिया स्टार्स उपस्थित राहणार आहेत. गौतमी पाटील, अंकिता प्रभू-वालावलकर, धनंजय पोवार, अनुश्री माने हे सोशल मीडिया स्टार्स ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या १००व्या भागात पाहायला मिळणार आहेत.