Marathi Actor Siddharth Khirid : ‘मुलगी झाली हो’, ‘फ्रेशर्स’, ‘राणी मी होणार’ या मालिकांमधून अभिनेता सिद्धार्थ खिरीड घराघरांत लोकप्रिय झाला. सध्या अभिनेता त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर फोटो शेअर करत सिद्धार्थने आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. याबरोबर त्याने गर्लफ्रेंडसह रोमँटिक फोटो देखील शेअर केले होते. चाहत्यांना नवीन वर्षात ही आनंदाची बातमी दिल्यावर आता सिद्धार्थने त्याच्या ड्रीम प्रपोजलचा व्हिडीओ सुद्धा शेअर केला आहे.
“दोन हृदय, दोन देश, दोन प्रोफेशन्स आणि त्यांची एक प्रेमकहाणी…” असं कॅप्शन देत अभिनेत्याने प्रेमाची कबुली दिली होती. सिद्धार्थ खिरीड सौंदर्यवती डॉ. मैथिली भोसेकरच्या प्रेमात आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे दोघं एकमेकांना ओळखतात. मैथिली कॅनडात असते. तिने फ्लोरीडा इथे पार पडलेल्या सौंदर्य स्पर्धेत ‘मिस इंटरनॅशनल वर्ल्ड पेटिट २०२२-२०२३’ हा खिताब पटकावला होता. भारतात आल्यावर ती सिद्धार्थच्या मालिकेचं शूट पाहायला गेली होती आणि इथेच यांची भेट झाली होती.
अभिनेत्याने शेअर केला खास व्हिडीओ
सिद्धार्थ खिरीडने मैथिलीला गोव्यात लग्नाची मागणी घातली आहे. यासाठी त्याने जय्यत तयारी केली होती. मैथिलीला सरप्राइज देण्यासाठी त्याने सुंदर प्लॅनिंग केलं होतं. यावेळी त्याने बॉलीवूड गाण्यांवर डान्स करत, आपल्या गर्लफ्रेंडला गोड सरप्राइज दिलं आणि त्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या.
अभिनेता गर्लफ्रेंडला प्रपोज करताना म्हणतो, “२२ एप्रिल २०२२…सगळं ‘टू टू टू’ आहे आणि आता माझ्या आयुष्यात फक्त तूच आहेस. खूप दिवसांपासून तुला प्रपोज करावं असं वाटत होतं. आता खूप हिंमत करून बोलतोय… तुझी यात काहीच चूक नाहीये. कारण, तुला बघितल्यावर लगेच मी प्रपोज केलं पाहिजे होतं. पण, माझी हिंमत होत नव्हती. आता आज सगळं जुळून आलंय… खूपच गोड आहे माझी मैथिली. सगळ्यांना अशी गर्लफ्रेंड…जी आता माझी बायको होईल अशी मुलगी मिळत नाही. फारशा तिच्या अपेक्षा नाहीयेत. वडापाव, मिसळपाव, पावभाजी हे पदार्थ दिले तरी ती खूश होऊन जाते. मैथिली पण एवढंच नाहीतर मला ज्या गोष्टी शक्य आहेत त्या सगळ्या मी तुला देण्याचा प्रयत्न करणार आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मैथिली…आय लव्ह यू बेबी.”
हेही वाचा : Bigg Boss 18: महाअंतिम सोहळ्याच्या १० दिवसांआधी झालं ‘मिड वीक एविक्शन’, कमी मतांमुळे ‘हा’ सदस्य घराबाहेर
यावर मैथिली म्हणाली, “मी जेव्हा तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडले होते. त्यानंतर आपण जो काही वेळ एकत्र घालवला तो मॅजिकल होता. मी नेहमी म्हणते, आयुष्यात एकदाच माझं लक चमकलंय जेव्हा मी तुला भेटले. तू माझा लकी चार्म आहेस. Sid तू, माझ्याशी लग्न करशील का?” यानंतर दोघांनी एकमेकांना मिठी मारत प्रेम व्यक्त केलं.