अभिनेता आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा अभिनेता सोहम बांदेकर हा सतत विविध कारणांमुळे चर्चेत असतो. सोहमने ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. त्याबरोबरच तो स्टार प्रवाहवरील ‘नवे लक्ष्य’ या मालिकेतही झळकला होता. नुकतंच सोहमने वडिलांकडून कोणती गोष्ट शिकला? याबद्दलचा खुलासा केला आहे.
सध्या सोहम हा ‘ठरलं तर मग’ या लोकप्रिय मालिकेच्या निर्मितीची धुरा सांभाळत आहे. काल, या मालिकेचा २०० वा भाग प्रसारित झाला. याच निमित्ताने ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या संपूर्ण टीमने श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी त्याने राजश्री मराठी ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला आदेश बांदेकरांकडून काय शिकलास? याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्याने सविस्तर उत्तर दिले.
आणखी वाचा : “‘बाईपण भारी देवा’मध्ये माझ्याबरोबर झळकलेली ती मुलगी…”, अखेर सोहम बांदेकरने दिले स्पष्टीकरण; म्हणाला, “आई माझ्यावर…”
“मी बाबांकडून अनेक गोष्टी शिकण्याचा प्रयत्न नेहमी करतो. पण मला बाबांनी एक गोष्ट सांगितली होती, ती म्हणजे तू किती गुण आणशील, काय करशील, याच्यावर माझी जबरदस्ती नाही. पण मला तुझ्याकडून एकच अपेक्षा आहे की तू चांगला माणूस व्हावं. त्यावेळी मला ते फार सोपं वाटायचं. अनेकदा असं वाटायचं की अरे ५० टक्के आणले तरीही मी एक चांगला माणूस बनू शकतो. परंतु आता कळतंय की मी एकवेळ ९० टक्के आणू शकतो, पण चांगला माणूस होणं आणि तसंच कायम राहणं हे फार अवघड आहे”, असे सोहमने सांगितले.
“खूपदा मला हे करायचं की ते करायचं असे प्रसंग आयुष्यात येतात. त्यावेळी आपण मनापासून विचार केला तर त्याची उत्तर लगेच कळतात. त्याबरोबरच त्यासाठी आई-वडिलांनी दिलेली शिकवण ही फार गरजेची असते. आई-वडिल हे कायम तुम्हाला शिकवत असतात. माझ्या वडिलांनी कायमच वेळेचा आदर केला, म्हणून आज त्यांच्या वेळेचा देखील आदर राखला जातो, जो मीदेखील राखण्याचा प्रयत्न करतो”, असेही सोहम यावेळी म्हणाला.
आणखी वाचा : “इतका रिकामा असतोस का?” आदेश बांदेकरांच्या लेकाला चाहत्याचा प्रश्न, सोहम म्हणाला “निकामी…”
दरम्यान “नवे लक्ष्य” ही सोहमची पहिलीच मालिका होती. या मालिकेतून त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. ही मालिका ७ मार्च २०२१ रोजी सुरु झाली आहे. या चित्रपटातील निर्मिती सोहम प्रॉडक्शन्सने केली होती. यात त्याने जय सुवर्णा दीक्षित ही भूमिका साकारली होती.