Swapnil Rajshekhar post about Anaya Bangar : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम लोकप्रिय अभिनेते स्वप्नील राजशेखर यांनी अनया बांगरसंदर्भात एक पोस्ट केली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू संजय बांगरचा मुलगा आर्यन हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी घेऊन मुलगी झाला आहे. त्याची नवीन ओळख अनया बांगर अशी आहे. अनाया तिच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आहे. अनयाबद्दल स्वप्नील यांनी केलेली पोस्ट लक्ष वेधून घेत आहे.

“तू वैयक्तिक कुणाचं काही नुकसान केलेलं नाहीयेस.. तरी तुला अशा इतक्या hate comments का येतात ?”
“माहिती नाही, कदाचित या लोकांच्या आयुष्यात अनेक insecurities आहेत, आणि मी या बदललेल्या शरीरातसुध्दा इतकी secured आहे..याचा त्रास त्यांना होत असावा…”
अनया सांगत होती… शांतपणे..
“हे पाहा दुःख, किंवा पाहा मी कशी अन्यायग्रस्त” अशा कुठल्याही अभिनिवेषाशिवाय..
लहान वयात इतकी शारीरिक, मानसिक आंदोलनं अनुभवून आलेल्या मॅच्युरिटीमुळे…
“मी तरी एका privileged कुटुंबातून आलेय.. ज्यांना जन्मजात कसल्याच सुविधा मिळाल्या नाहीयत अशा ट्रान्सजेंडर्सच्या अवस्थेची कल्पना करू शकत नाही…”

अनया मनापासून बोलत होती…
प्रसिद्ध क्रिकेटर संजय बांगरचा पुर्वाश्रमीचा क्रिकेटर मुलगा आर्यन बांगर, आता लिंगबदल शस्त्रक्रिया करुन अनया बांगर झालाय… तिच्या नव्या मुलाखतीत आपले भलेबुरे अनुभव सांगताना, काही सहक्रिकेटपटूनी किंवा कोण्या एका सिनिअर क्रिकेटपटूने आपला लैंगिक फायदा घेण्याचा प्रयत्न केला हे तिने सांगितलं आणि प्रसिद्धी माध्यमाना खाद्य मिळालं…
त्यानी नव्याने अनयाला कॅश करायला सुरुवात केलीय.
पण सौरभ द्विवेदीने घेतलेली अनयाची मुलाखत पाहताना माझ्या मनात करुणा दाटून येत होती ती माझ्यातल्या अपराध भावनेनं. तिला अशा करुणेची गरज नाही..
ती सक्षम आहे..

मी स्वतः सुद्धा माझ्या वयाच्या २५ पर्यंत transphobia ग्रस्त होतो..
नंतर कधीतरी हळूहळू माणूसपण समजू लागलं..
जातपात धर्मवर्ण सोबतच लिंगभेद किती हीन आहे याची जाणीव झाली… अन मग LGBTQ+ समजून घेण्याची प्रक्रियाही सुरू झाली…
अपराधभावना त्याआधीच्या माझ्या मुर्खपणामुळे आजही येते…
आपल्या संघर्षाबद्दल सांगताना अनया म्हणाली “यातलं मानसिक द्वंद्व खूप कठीण आहे.. आपलं मन, मेंदू आणि आपलंच आरशात दिसणारं शरीर यांच्यात ताळमेळ नसणं, एकात्मता नसणं आणि कालांतराने त्या शरीराबद्दल घृणा वाटू लागणं हा सगळा अनुभव भयंकर आहे..”
आधीही खुपदा हे ऐकून, वाचून हे पुन्हा ऐकताना मी नव्याने शहारलो..
अनया आणि तिच्यासारखे लाखो LGBTQ+ समुहातले लढत रहातील.. त्यांची चिंता नको… त्यांचा लढा दुर्दैवी तरी अपरिहार्य आहे..
पण अनया सारख्यांच्या पोस्ट्सखालच्या बहुतांशी भयंकर, गलिच्छ, हिंसक, मूर्ख कमेंट्स वाचल्यानंतर कळतं की आजही आजारी आपण आहोत समाज म्हणून…
आणि आपल्या आजाराची चिंता करण्याची जास्त गरज आहे…
देव भलं करो समस्तांचं!!

स्वप्नील राजशेखर यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत. ‘काय परफेक्ट बोलला आहेस स्वप्नील, खरच खूप बाबतीत आपला समाज आजारीच आहे अगदी योग्य शब्द आहे….’, टमुळात व्यक्ती स्वातंत्र्य ही कन्सेप्टच मान्य नाहीये बऱ्याच लोकांना, आपलं आयुष्य कसं जगावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे,’ अशा कमेंट्स स्वप्नील यांच्या पोस्टवर आहेत.