मराठी मालिकाविश्वातील स्थिती बिकट असल्याची पोस्ट मराठी मालिका व चित्रपटांमध्ये काम करणारे अभिनेते उमेश बने यांनी केली आहे. वेळेत मानधन मिळत नाही, काही ठिकाणी जेवणाची, काही ठिकाणी राहण्याची व्यवस्था वाईट असते, असं त्यांनी म्हटलं आहे. ठरलेल्या शिफ्टच्या वेळेनंतरही कलाकार काम करतात, पण त्यांना जास्तीचा मोबदला मिळणं दूरच, मानधनही वेळेत मिळत नाही, असा खुलासा त्यांनी केला आहे.
उमेश बने यांनी महाराष्ट्रातील मालिका कलावंतांची अवस्था राज्यातील भिकाऱ्यासारखी आहे, असं म्हटलं आहे. काही जणांचं एवढं मानसिक खच्चीकरण झालं आहे की त्यांनी आत्महत्येच्या पोस्ट टाकल्या आहेत. हा विषय पेट घेण्याआधी त्याची दखल घ्या, अशी विनंती बने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केली आहे.
हेही वाचा – ‘धरतीपुत्र नंदिनी’ फेम अभिनेता अमन जैस्वालचे अपघाती निधन, ट्रकने दिली धडक
उमेश बने यांची पोस्ट नेमकी काय?
“माननीय मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस साहेब राज्यातल्या भिकाऱ्यासारखीच महाराष्ट्रातील मालिका कलावंतांची अवस्था आहे. तब्बल ९० दिवसानंतर मिळणारं पेमेंटही वेळेवर मिळत नाही. इन्कम टॅक्सच्या नावाखाली टीडीएस कट केला जातो, तो वेळेवर भरला जात नाही. हाताच्या बोटावर मोजण्याइतपत प्रॉडक्शन हाऊस सोडली तर इतर ठिकाणी कलावंतांचे हालच, काही ठिकाणी खाण्याची व्यवस्था वाईट. शिफ्टची वेळ ठरलेली असूनसुद्धा कोणताही अतिरिक्त मोबदला न घेता कलाकार रात्री उशिरापर्यंत शूटिंग करतो. तरी त्याला ९० दिवसांनी मिळणारे मानधन वेळेवर मिळत नाही. तुम्ही माहितीच्या आधाराखाली सगळ्या प्रॉडक्शन हाऊसचे अकाउंट चेक करा, सत्य समोर येईल. काही जणांच्या मानसिकतेच एवढं खच्चीकरण झालंय की, त्यांनी आत्महत्येच्या पोस्ट टाकल्या. उद्या हा विषय पेट घेण्याआधी कृपया महाराष्ट्रातल्या, देशभरातल्या कलावंतांसाठी विधानसभेत आणि लोकसभेत हा विषय चर्चेला घ्या. कलाकारांना वेळेवर मानधन मिळालं पाहिजे त्यांच्या हिताचं रक्षण झालं पाहिजे असा GR काढून तो चॅनल आणि निर्मात्यांना बंधनकारक करा,” अशी पोस्ट उमेश बने यांनी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मदत मागितली आहे.
कलाकार म्हणून मी माझी व्यथा मांडलीय जी सत्य आहे, तुम्ही दिग्दर्शक, तंत्रज्ञ कला क्षेत्रातले अजूनही कुणी अन्यायाने पीडित असाल, तर व्यक्त व्हा स्वतःची पोस्ट टाका, आपलं म्हणनं राज्यातल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवा, असं कॅप्शन देत अभिनेता उमेश बने यांनी पोस्ट केली आहे.
© IE Online Media Services (P) Ltd