‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व चांगलं गाजलं. यामध्ये सहभागी झालेलं कलाकार सध्या खूप चर्चेत आहेत. विविध कार्यक्रमांमध्ये पाहायला मिळत आहेत. निक्की तांबोळी आणि अभिजीत सावंत ‘सेलिब्रिटी मास्टर शेफ’ या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहेत. तसंच ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात झळकलेली ‘किलर गर्ल’ आणि ‘टास्क क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी जान्हवी किल्लेकरची ‘स्टार प्रवाह’च्या परिवारात एन्ट्री झाली आहे. ‘स्टार प्रवाह’ची लोकप्रिय मालिका ‘अबोली’मध्ये जान्हवीची जबरदस्त एन्ट्री पाहायला मिळाली. या मालिकेत तिने इन्स्पेक्टर दीपशिखा भोसले पाटील ही भूमिका साकारली आहे. त्यानंतर आता ‘बिग बॉस मराठी’शी खास कनेक्शन असलेले ज्येष्ठ अभिनेते ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत पाहायला मिळणार आहेत.
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील सध्याच्या लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘येड लागलं प्रेमाचं’. अभिनेत्री पूजा बिरारी, विशाल निकम, नीना कुलकर्णी, आतिशा नाईक, संग्राम साळवी अशी तगडी कलाकार मंडळी ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत पाहायला मिळत आहेत. गेल्या वर्षी सुरू झालेल्या या मालिकेला आठ महिने पूर्ण झाले आहेत. सुरुवातीपासून ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. एकमेकांचा तिरस्कार करणाऱ्या राया आणि मंजिरीच्या प्रेमाच्या गोष्टीने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. आता या कथानकात आणखी एका पात्राची भर पडली आहे.
‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात झळकलेले ज्येष्ठ अभिनेते विद्याधर जोशी उर्फ बाप्पा यांची एन्ट्री झाली आहे. याबाबत ‘मराठी सीरियल’ या इन्स्टाग्राम पेजवर माहिती देण्यात आली आहे. ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत बाप्पा महत्त्वाच्या पाहायला मिळणार आहेत.
हेही वाचा – हळद लागली! ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्याच्या हळदीचे फोटो आले समोर, पाहा
सध्या मालिकेत काय सुरू आहे?
मंजिरीला खोकला लागल्यामुळे जय आणि राया मध आणायला गेलेले असतात. पण तितक्यात राया झाडावर मधमाश्यांचं पोळ दिसतं. त्यामुळे रायाला मधमाश्यांच्या पोळ्यातून मध घेण्यासाठी झाडावर चढतो. हा डाव पलटवण्यासाठी जय मधमाश्यांच्या पोळ्याला दगड मारतो. त्यामुळे मधमाशा रायाला चावतात. तरीही राया मध घेऊन येतो. यावेळी मधमाश्यांमुळे रायाला झालेल्या जखमा पाहून मंजिरीला काळजी वाटते. त्यानंतर रायाच्या जखमा पाहून जीजीच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हा जीजी स्वतःच्या हाताने रायाला मलम लावते. यावेळी जीजीच्या मायेच्या स्पर्शाने राया भावुक होतो.