अभिनेता विकास पाटील हा मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. आतापर्यंत अनेक मालिकांमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारत तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. काही महिन्यांपूर्वीच तो ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेत झळकला. तर आता त्याने त्याला आलेला स्वामी समर्थांचा अनुभव शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विकास नुकताच सुलेखा तळवलकरच्या यूट्यूब चॅनैलवरील ‘दिल के करीब’ या कार्यक्रमात पाहुणा म्हणून उपस्थित होता. त्यावेळी दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याला स्वामी समर्थांचा आलेला अनुभव शेअर केला. तो म्हणाला, “आमच्या घरी धार्मिक वातावरण असल्याने सुरुवातीपासूनच माझी अध्यात्मिक बैठक होती. आमच्या घरी कलावती आईंची उपासना केली जायची, पण मी जेव्हा पुण्यातून नाटकं करायचो, तेव्हा माझ्या आयुष्यात स्वामी समर्थ आले. अविनाश देशमुख यांच्या नाटकात मी काम करत होतो तेव्हा नाटक संपल्यावर एकदा अक्कलकोटहून काही लोक सरांना भेटायला आले होते. त्यांनी अविनाश देशमुख यांना स्वामी समर्थांची एक फ्रेम भेट दिली होती. ती मंडळी गेल्यावर मी तिथे गेलो तेव्हा अविनाश सर मला म्हणाले की, ही फ्रेम तू घरी घेऊन जा. तेव्हा मला स्वामी समर्थ कोण हे माहीत होते, पण माझा त्यांच्याशी फारसा संबंध आला नव्हता. अविनाश सरांच्या सांगण्यावरून मी ती फ्रेम घरी आणली आणि माझ्या बेडरूममध्ये लावली. येता-जाता मी त्याला नमस्कार करायचो.”

हेही वाचा : “आयुष्य जगल्याचा अनुभव…”, प्रसिद्ध अभिनेत्याने मानले स्वामी समर्थांचे आभार, पोस्ट चर्चेत

पुढे तो म्हणाला, “त्यानंतर आता ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत मी स्वामी समर्थांच्या मानसपुत्राची भूमिका साकारली. त्यात माझा आणि स्वामींचा एक सीन आहे, ज्यात स्वामी मला म्हणजेच स्वामीसुतांना असं सांगतात की, तू माझा खरोखर भक्त असशील तर तू मला भेटण्याच्या खूप आधीपासून मी तुझी काळजी घेत असतो. तेव्हा मी या सगळ्या गोष्टी खूप रिलेट करू लागलो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की, काही वर्षांपूर्वी माझ्या घरी स्वामींची फ्रेम येणं, त्यांचे काही अनुभव येणं, जेव्हा जेव्हा मी एखाद्या संभ्रमात असायचो, तेव्हा एक शक्ती मला जाणवायची जी मला पाठिंबा द्यायची. तेव्हा मला कळलं की ते स्वामीच होते. ती भूमिका मला त्यासाठीच आली होती असं मला वाटतं. स्वामींच्याबद्दल, माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माझ्या मनात जे प्रश्न होते त्या सगळ्यांची उत्तरं मला ही भूमिका साकारताना मिळाली.”

आणखी वाचा : Video: टुमदार घर, बाजूला हिरवंगार शेत…; ‘बिग बॉस मराठी’ फेम विकास पाटीलने दाखवली गावाकडील शेतीवाडीची झलक

शेवटी त्याने आणखी एक अनुभव शेअर केला. तो म्हणाला, “जेव्हा मला या भूमिकेसाठी विचारणा झाली, त्याच्या आदल्याच आठवड्यात मी अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर आणि पंढरपूर या ठिकाणी जाऊन आलो होतो. तिथेही खूप चमत्कारिक गोष्टी घडल्या. मी अक्कलकोटला जाण्याच्या आधी तिथे एक जण माझ्या ओळखीचे आहेत त्यांना दर्शनाची सोय करण्यासाठी फोन केला होता. तेव्हा ते मला म्हणाले की, मी तेव्हा तिथे नसेन, पण कोणीतरी असेल… तू जा. आम्ही तिथे गेल्यावर देवळातील एक जण आमच्यासमोर आले आणि मला त्यांनी सोवळं नेसायला देऊन तयार व्हायला सांगितलं. मी सोवळं नेसून तयार झाल्यावर त्यांनी मला थेट स्वामींच्या मोठ्या फोटोसमोर नेऊन उभं केलं. माझ्या हातात आरतीचं ताट देऊन ते मला म्हणाले की, आज आरती तुमच्याहातून. तो दिवस होता राम नवमीचा. पावणे बारा वाजता आम्ही तिथे पोहोचलो आणि १२ वाजता रामजन्माचा सोहळा होणार होता. त्याप्रमाणे दुपारी १२ वाजता त्यांनी माझ्या हातात रामाची छोटी मूर्ती दिली, ती मी पाळण्यात ठेवली, नंतर स्वामींचा नैवेद्य घेऊन मी समाधी मठात गेलो. तिथून बाहेर पडल्यावर मी विचार करू लागलो की हे काय होतं? यापैकी आपण काहीच ठरवलं नव्हतं. मग माझ्या लक्षात आलं की, हे सगळं स्वामींनी आधीच ठरवून ठेवलं होतं. त्यानंतर जेव्हा मला या भूमिकेसाठी विचारणा झाली, तेव्हा मला लक्षात आलं की स्वामींनी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठीच तिथे बोलवून घेतलं आणि हे सगळं आपल्या हातून करून घेतलं.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor vikas patil shares his experience of swami samartha rnv
Show comments