अभिनेता विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांना मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडपं म्हणून ओळखलं जातं. त्या दोघांनी अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर ३ मे २०२२ रोजी लग्नगाठ बांधली. गेल्या कित्येक वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत होते. विराजस आणि शिवानी या दोघांचेही असंख्य चाहते आहेत. ते दोघे एकत्र कधी काम करणार असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. नुकतंच यावर विराजसने भाष्य केले आहे.
विराजस कुलकर्णीने मंगळवारी (२८ फेब्रुवारी) त्याचा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने त्याने इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत प्रेक्षकांशी गप्पा मारल्या. यावेळी विराजसला शिवानीबरोबर काम कधी करणार? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने मलाही तिच्याबरोबर काम करायला आवडेल, असं सांगत सविस्तर उत्तर दिलं.
आणखी वाचा : “विराजसशी लग्न झाल्यावर…” शिवानी रांगोळे सासूला कोणत्या नावाने हाक मारते? स्वत:च केला खुलासा
“मला शिवानीबरोबर काम करायला नक्कीच खूप आवडेल. पण हे आमच्या दोघांच्याही हातात नाही. शिवानी आणि मी एकत्र काम करणं हे एखाद्या छान दिग्दर्शक-निर्मात्याच्या हातात आहे. तुम्ही प्रेक्षकांनी त्यांना सांगा की आम्हाला या दोन कलाकारांना एकत्र पाहायचं आहे.
आम्हाला अनेक संधी आल्या आहेत, पण आम्ही एकत्र काम करणार असू आणि पहिल्यांदा एकत्र स्क्रीनवर झळकणार असू, तर मग ते काही तरी स्पेशल असायला हवं, असं आम्हाला दोघांनाही वाटतंय. त्यामुळे असा कोणता तरी चांगला स्पेशल प्रोजेक्ट आला तर आम्ही एक कलाकार म्हणून तुमच्यासमोर एकत्र यायला नक्कीच आवडेल”, असे विराजसने यावेळी म्हटले.
आणखी वाचा : “वडील सलीम खान यांचे हेलनबरोबर लग्न झाल्याचे कळताच माझी आई…” अरबाज खानचा मोठा गौप्यस्फोट
दरम्यान शिवानी रांगोळे ही लवकरच एका नव्या मालिकेत झळकणार आहे. झी मराठी वाहिनीवर लवकरच ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रसारित होणार आहे. तर विराजस हा ‘सुभेदार’ या चित्रपटात झळकणार आहे. त्याच्या या चित्रपटातील भूमिकेबद्दल जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत.