Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरचं प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या पहलगामच्या बैसरन येथे मंगळवारी, २२ एप्रिलला दुपारी दहशतवादी हल्ला झाला. गेल्या सहा वर्षांतील काश्मीरमधील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केलं. यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचादेखील समावेश आहे.
पहलगाममध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतासह जगभरात संतापाची लाट पसरली आहे. सोशल मीडियाद्वारे प्रत्येक जण संताप व्यक्त करत आहेत. कलाकार मंडळीदेखील फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स या माध्यमातून संतप्त भावना व्यक्त करून अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. अभिनेते आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) पदाधिकारी किरण माने यांनी नुकतीच पोस्ट करत आपलं परखड मत मांडलं आहे.
किरण माने यांनी काश्मीरमध्ये अडकलेल्या आसावरी जगदाळेंच्या वृत्ताचा व्हिडीओ शेअर करत लिहिलं, “राजकीय नेत्यांनी प्रसिद्धीत, चमकोगिरीत आणि न्यूज मोठी करण्यात वेळ घालवू नका. आम्ही संकटात आहोत. इथं आम्हाला कुणी वाली नाहीये.” …डोळ्यांसमोर आपले वडील आणि काकांना गोळ्या घातलेलं दृश्य पाहिलेली आसावरी जगदाळे ही भगिनी काय बोललीय हे नीट ऐका.”
“नाक्या-नाक्यावर चेकपोस्ट असताना या घटनास्थळी मात्र कुणीही नव्हते हे खूप संशयास्पद आहे. पुलवामासारखे हे ही प्रकरण प्रसिद्धीसाठी वापरून दडपून टाकले जाईल का? अंधभक्त पिलावळीच्या बिनडोक पोस्ट्समुळे तरी असेच वाटतेय की याचा फायदा धर्मद्वेष पसरवून समाजात फूट पाडण्यासाठी आणि निष्क्रिय निर्लज्जांना ‘हिरो’ बनवण्यासाठी होऊ लागला आहे,” असं किरण माने यांनी लिहिलं आहे.
पुढे किरण मानेंनी लिहिलं की, स्वत: संकटात असताना, ‘आम्ही हिंदू मुस्लीम भावाबहिणींसारखे राहतो. आम्हाला तुमच्या वादात का ओढता?’ अशी आर्त हाक देणार्या आपल्या या बहिणीला, आसावरीला मनापासून सलाम. आसावरी आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत…भावाबहिणींनो, न्यूज चॅनल्स बघणं टाळा. खलनायकांना नायक बनवण्याच्या कटाला साथ देऊ नका. पुलवामा घातपात विसरू नका. याचा छडा लागून खरे आरोपी कोण होते? हे समोर आल्याशिवाय कशावरही विश्वास ठेवू नका.
“आता मी जी क्लीप टाकलीय ती न्यूज चॅनलवरचीच आहे. पण खरी क्लीप सात मिनिटांची आहे, ज्यात खूप असे मुद्दे हायलाईट केलेत जे द्वेष पसरवतील आणि नालायकांना क्लीन चीट देतील. त्यातला हा जो दीड मिनिटांचा आशय आहे तो मात्र हायलाईट केला जात नाही. आपल्याला सगळ्यांना, सर्वधर्मीय नागरिकांना एक ‘देश’ म्हणून, एकजुटीनं भक्कमपणे उभं राहणं गरजेचं आहे…जय शिवराय…जय भीम…जय हिंद!,” किरण मानेंची ही पोस्ट सध्या खूप चर्चेत आली आहे.