‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातून १० वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर डॉ. निलेश साबळे सध्या ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या नव्या कार्यक्रमातून प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे. २७ एप्रिलपासून ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर सुरू झालेल्या या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ कार्यक्रमात निलेश साबळेसह भाऊ कदम, ओंकार भोजने सुपर्णा श्याम , स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण आदी कलाकार पाहायला मिळत आहेत. या नव्या कार्यक्रमाचं लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशी संपूर्ण धुरा डॉ. निलेश साबळे स्वतः सांभाळत आहे. अशातच ‘चला हवा येऊ द्या’साठी कपिल शर्मा शोची कॉपी केली म्हणणाऱ्यांना निलेश साबळेनं स्पष्टच उत्तर दिलं आहे.
‘तारांगण’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनलशी संवाद साधताना निलेश साबळेनं कपिल शर्माच्या शोची कॉपी केली म्हणणाऱ्यांना उत्तर दिलं. निलेश म्हणाला, “अनेकजण म्हणतात कपिल शर्मा शोची कॉपी केलीत. तर होय. खरंच कॉपी केली. चांगल्याची कॉपी करणं त्यात काय वाईट आहे. कारण मी हे कधीच म्हणणार नाही, हे मला सुचलं. मी एका झाडाखाली बसलो. मला असं वाटलं ‘चला हवा येऊ द्या’ सुरू करूया, तर असं काही नाही.”
पुढे निलेश म्हणाला, “कपिलने केलं होतं, ते मला नंतर करावंस वाटलं. याच कारण होतं ‘लय भारी’ चित्रपट. रितेश देशमुखने विचारलं होतं की, तुम्ही कपिलसारखा एखादा शो, पूर्णपणे प्रमोशनचा शो करू शकता का? कारण डान्सच्या शोमध्ये आम्ही प्रमोशन करतो, अमूक ठिकाणी प्रमोशन करतो. तर ती वेळ कमी असते. पण पूर्णपणे चित्रपट, नाटकाचं प्रमोशन होऊ शकतं का? यासाठी तुम्ही एखादा शो करून शकता का? हे त्याने सुचवलं होतं. त्यातूनच ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम निर्माण झाला होता.”
हेही वाचा – ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेता झळकला नव्या मालिकेत, पाहा नवं रुप
“१० वर्ष ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचा नाटक आणि चित्रपटाच्या प्रमोशनला खरंच खूप फायदा झाला. मला मोठमोठी लोक सांगतात, नाटकाची बुकिंग वाढले किंवा चांगला फायदा झाला. त्यामुळे जर त्यातून इंडस्ट्रीचा फायदा होणार असेल आणि अर्थात प्रेक्षकांचा काहीतरी चांगलं बघायला मिळणार असेल तर ते मी केलं पाहिजे, असं वाटतं,” असं स्पष्ट मत निलेश साबळेनं मांडलं.