‘झी मराठी’ वाहिनीवर आजपासून ‘ड्रामा ज्युनिअर्स’ हा नवाकोरा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या कार्यक्रमात लहान मुलांचा बहुरंगी अभिनय पाहता येणार आहे. या लहान अतरंगी मुलांचं परीक्षण अभिनेत्री अमृता खानविलकर व अभिनेता संकर्षण कऱ्हाडे करणार आहे. तसंच सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिनेत्री जबाबदारी ‘झी मराठी’च्या जुन्या व लोकप्रिय कलाकाराकडे देण्यात आली आहे. ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्रेया बुगडे ‘ड्रामा ज्युनिअर्स’ कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. काही दिवसांपूर्वी याचा जबरदस्त प्रोमो समोर आला होता. अशातच या कार्यक्रमासंदर्भात नुकतीच संकर्षण कऱ्हाडेने एक पोस्ट शेअर केली आहे; जी चांगलीच चर्चेत आली आहे.

अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही क्षेत्रात आपल्या दमदार अभिनयाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये संकर्षणचं आवर्जुन नाव घेतलं जातं. अभिनया व्यतिरिक्त संकर्षणच्या कविता आणि त्याचं उत्कृष्ट सूत्रसंचालन या गोष्टी प्रेक्षकांना खूप आवडतात. पण आता परीक्षक म्हणूनही तो पाहायला मिळणार आहे. आजपासून सुरू होणाऱ्या ‘ड्रामा ज्युनिअर्स’ कार्यक्रमाचा तो परीक्षक असणार आहे. याचे फोटो शेअर करत संकर्षण म्हणाला, “पहिल्यांदाच परीक्षक ‘ड्रामा जूनियर्स’…खरं सांगू का; मी साफ नकोच म्हणलं होतं…वाटलं की, मी का आणि काय कुणाचं परीक्षण करणार? पण ‘झी मराठी’ने फार विश्वासाने ही जबाबदारी दिलीये”

हेही वाचा – १७ वर्षांचा जुना नियम यंदा ‘बिग बॉस ओटीटी ३’ने तोडला; स्पर्धकांना दिले पर्सनल फोन अन्…; जाणून घ्या नवा ट्विस्ट

“२००८ साली स्पर्धक म्हणून झी मराठीनेच संधी दिली होती, आता त्यांनीच परीक्षकाचा मान दिलाय…विश्वास ठेवा…मी हे ही काम अत्यंत प्रामाणिकपणे करीन…तुमची साथ आहे ना? आहेच असं प्रेमाने, हक्काने गृहीत धरतो…कामाला लागतो…’ड्रामा जूनियर्स’ आजपासून शनिवार-रविवार रात्री ९ वाजता झी मराठीवर आणि हो नाटकाचे प्रयोग चालूच आहेत. उद्या सायंकाळी ५.३० वाजता नाशिक नियम व अटी लागू,” असं संकर्षणने लिहिलं आहे.

दरम्यान, ‘ड्रामा ज्युनिअर्स’ या नव्या कार्यक्रमाची घोषणा गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झाली होती. त्यानंतर कार्यक्रमासाठी विविध शहरातून लहान मुलांच्या ऑडिशन्स घेण्यात आल्या आणि त्यातून अतरंगी मुलांना निवडण्यात आलं.