Aarti Solanki: सूरज चव्हाण (Suraj Chavan) बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरल्यावर पहिल्या पर्वातील एका अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत आलं आहे. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात स्पर्धक राहिलेली अभिनेत्री आरती सोळंकी हिने हा शो सुरू झाला तेव्हा सूरजबद्दल विधान केलं होतं. जर सूरज चव्हाणने बिग बॉसची ट्रॉफी जिंकली तर मी पुढचा सीझन बघणार नाही, असं ती म्हणाली होती. आता सूरज जिंकल्यावर तिने काय म्हटलंय, ते जाणून घेऊयात.

रीलस्टार सूरज चव्हाणने बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाची ट्रॉफी जिंकली आहे. तर अभिजीत सावंत उपविजेता ठरला. यानिमित्ताने आरती सोळंकीने काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं, त्यावर आता तिने प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाली होती आरती सोळंकी?

सूरज चव्हाण टॉप ३ मध्ये असेल का? असा प्रश्न आरती सोळंकीला ‘अल्ट्रा बझ मराठी’च्या मुलाखतीत विचारण्यात आला होता. “जे चांगले खेळत आहेत, तेच टॉप ३ मध्ये दिसावेत. सूरज चव्हाणला सगळे जण तो गरीब परिस्थितीतून आला आहे, या कारणामुळे पाठिंबा देतात. पण, ज्याला हा खेळ समजला, जो हा खेळ खेळणार आहे, तो जिंकावा,” असं ती म्हणाली होती.

हेही वाचा- Bigg Boss Marathi: जान्हवी किल्लेकरला जाऊबाई म्हणाली, “मी घरात येऊन तुला मारलं असतं…”

तर पुढचा सीझन मी बघणार नाही – आरती

“जर सूरज खेळ खेळलाच नाही आणि फक्त सहानुभूतीच्या आधारावर बिग बॉसची ट्रॉफी घेऊन गेला, तर पुढचा सीझन मी बघणार नाही. मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते की, या शोमुळे त्याची लोकप्रियता दुप्पट व्हावी. त्याला जास्त मानधन मिळावे; पण न खेळता सूरज जिंकला नाही पाहिजे”, असे वक्तव्य आरती सोळंकीने केले होते.

सूरज चव्हाणने Bigg Boss Marathi जिंकल्यावर अंकिता वालावलकरची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, “मिळालेलं…”

सूरज चव्हाण जिंकल्यावर आरतीची प्रतिक्रिया

सूरज जिंकल्यावर ‘मी गरीब आहे’ अशी पोस्ट आरतीने केली, या पोस्टबद्दल ‘राजश्री मराठी’शी बोलताना तिने स्पष्टीकरण दिलं. “सूरजला जिंकवून यांनी माझ्यावर अन्याय केला आहे आणि ती पोस्ट मी माझ्यासाठी केली होती की मीसुद्धा गरीब आहे. बिग बॉसच्या पहिल्या पर्वात मी गेले तेव्हा पहिल्याच आठवड्यात मला बाहेर काढलं गेलं. मीसुद्धा गरीब आहे. मी २४ वर्षांपासून या इंडस्ट्रीत संघर्ष करतेय, त्यावेळी त्यांनी माझा विचार न करता मला एका आठवड्यात घराबाहेर काढलं, त्यासाठी माझा आवाज बसलाय हे कारण मला दिलं. घरात १०० दिवस राहण्यासाठी माझ्याकडे कपडे घ्यायला पैसे नव्हते. मी या शोचा अॅडव्हान्स मागून कपडे घेतले होते,” असं आरती म्हणाली.

हेही वाचा – Bigg Boss Marathi 5 चा विजेता सूरज चव्हाणचे वय अन् शिक्षण किती? जाणून घ्या

“हा खेळ गरीब-श्रीमंत बघून नाही तर खेळून जिंकला जाऊ शकतो. माझा सूरजवर राग नाही, मी त्याची शत्रू नाही, एक गरीब जिंकला याचा मला आनंद आहे. पण गरीब व श्रीमंत बघून या खेळात कोण टिकणार हे ठरवते, त्या वृत्तीचा मला राग आहे. मला पहिल्या पर्वात संधी मिळाली असती तर मी टॉप ५ मध्ये असते. प्रेक्षक म्हणून मला मत मांडण्याचा अधिकार आहे, मी त्याचा खेळ पूर्ण सीझन पाहिलाय, त्याच्यापेक्षा बरेच लोक ट्रॉफी डिझर्व्ह करणारे होते. माझ्या या मतावर लोक मला ट्रोल करतात, पण बिग बॉसची माजी स्पर्धक म्हणून कोणीच माझी बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. सूरज जिंकला हे अनेकांना पटलं नाही,” असं आरती सोळंकी म्हणाली.