Abhidnya Bhave Post: मराठीसह हिंदी मालिकाविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिज्ञा भावे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नेहमी नवनवीन फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी ती नवऱ्यांबरोबर दार्जिलिंगला फिरायला गेली होती. याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. त्यानंतर नुकतीच तिने वडिलांच्या वाढदिवसानिमित्ताने सुंदर पोस्ट लिहिली आहे.

वडिलांबरोबरचे खास क्षणाचे फोटो, व्हिडीओ शेअर करत अभिज्ञा भावे ( Abhidnya Bhave ) त्यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिज्ञाने लिहिलं, “प्रिय बाबा, तुम्ही सर्वात मौल्यवान आहात. एकुलती एक असून माझे नको ते लाड न केल्याबद्दल धन्यवाद. लहानपणापासून स्वावलंबी बनवल्याबद्दल धन्यवाद. कमी वयात आयुष्य आणि पैशांची किंमत शिकवल्याबद्दल धन्यवाद. कमी वयात फिरण्याची आवड निर्माण केल्याबद्दल धन्यवाद.”

पुढे अभिज्ञा भावेने ( Abhidnya Bhave ) लिहिलं, “जगाने चुकीचे निवडले तरी न घाबरता निर्भयपणे काय बरोबर आहे ते निवडायला शिकवल्याबद्दल धन्यवाद. समाजातील लोक काय म्हणतील याची भीती न बाळगता स्वतःसाठी बोलायला शिकवल्याबद्दल धन्यवाद. माझ्यावर आणि माझ्या स्वप्नांवर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद. माझ्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या प्रत्येक व्यक्तीवर प्रेम केल्याबद्दल धन्यवाद. जरी ते तुमचे कर्तव्य नसले तरी….मला मुलीसारखे वागवल्याबद्दल आणि मुलासारखे प्रेम केल्याबद्दल धन्यवाद….तुम्ही सर्वोत्कृष्ट बाबाचे उदाहरण आहात, त्यासाठीही धन्यवाद. हॅप्पी उदय दिवस. सदैव निरोगी राहा आणि ईश्वराचे आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहेत.”

अभिज्ञा भावेच्या ( Abhidnya Bhave ) या सुंदर पोस्टवर इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया देत तिच्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मानसी नाईक, रेश्मा शिंदे, मयुरी देशमुख या अभिनेत्रींच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तसंच अभिज्ञाचा पती मेहुल पै प्रतिक्रिया देत म्हणाला, “कमी वयात तुझ्या फिरण्याच्या व्यसनाचा परिणाम मी अनुभवतो आहे.”

दरम्यान, अभिज्ञा भावेच्या ( Abhidnya Bhave ) कामाबद्दल बोलायचं झालं तर, कधी नायिका तर कधी खलनायिकेच्या भूमिकेत झळकलेल्या अभिज्ञाने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. ‘तुला पाहते रे’ मालिकेमधील मायरा असो किंवा ‘तू तेव्हा तशी’ मालिकेतील पुष्पवली असो तिच्या या भूमिका अजूनही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. अभिज्ञाने ‘खुलता कळी खुलेना’, ‘रंग माझा वेगळा’, ‘देवयानी’, ‘अस्मिता’, ‘लगोरी’ अशा बऱ्याच मालिकेत काम केलं आहे.