Marathi Actress Aditi Dravid Engagement : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजेच गुढीपाडवा! यामुळेच या शुभदिवशी अनेक मराठी कलाकारांनी गाड्या, नवीन घरं घेतल्याचं पाहायला मिळालं आहे. याशिवाय मालिकाविश्वात काम करणाऱ्या एका लोकप्रिय अभिनेत्रीने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे. इन्स्टाग्रामवर साखरपुड्याचे फोटो शेअर करत या अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

अभिनेत्री, निवेदिका, गीतकार आणि नृत्यांगना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री अदिती द्रविडचा साखरपुडा नुकताच थाटामाटात पार पडला आहे. अभिनेत्रीने साखरपुड्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत तिच्या तमाम चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

अदितीने सुरुवातीला साखरपुड्यातील रिंग सेरेमनीचा फोटो शेअर केला. यानंतर तिने होणाऱ्या पतीबरोबर आणखी काही फोटो शेअर करत, कॅप्शनमध्ये ‘अदिती झाली मोहित’ हा सुंदर हॅशटॅग दिला आहे. यावरून अभिनेत्रीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव मोहित लिमये असल्याचं स्पष्ट होत आहे. रिंग सेरेमनीला अदितीने सुंदर असा लेहेंगा घातला होता. याशिवाय पारंपरिक लूक करून देखील अदितीने होणाऱ्या नवऱ्यासह सुंदर असं फोटोशूट केलं आहे.

लाल रंगाची साडी आणि त्यावर पारंपरिक दागिने घालून अदिती खूपच सुंदर दिसत होती. अभिनेत्रीच्या साखरपुड्याच्या फोटोंवर सध्या संपूर्ण कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. अभिजीत खांडकेकर, निखिल चव्हाण, अपूर्वा गोरे, आदिश वैद्य अशा अनेक कलाकारांनी कमेंट्स करत अभिनेत्रीला या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, अदिती द्रविडच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर आजवर ‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ अशा गाजलेल्या मालिकांमध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. अदिती उत्तम गीतकार सुद्धा आहे. ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमातील ‘मंगळागौर’ गाणं अदितीने स्वत: लिहिलं होतं. या गाण्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. हे गाणं लोकप्रिय गायिका सावनी रविंद्रने गायलं आहे. आता अदिती लग्नबंधनात केव्हा अडकणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.