सोशल मीडिया हे असे माध्यम आहे, ज्याचा उपयोग सामान्य व्यक्तीपासून प्रसिद्ध व्यक्तीपर्यंत सर्व जण करताना दिसतात. वेगवेगळ्या पद्धतींची माहिती, गाणी, डान्स, विनोदी रील्स अशा माध्यमांतून मनोरंजन असे विविध प्रकारचे कंटेन्ट सोशल मीडियावर पाहायला मिळतात. लोकप्रिय कलाकारदेखील सोशल मीडियावर सक्रिय असतात. अभिनयाबरोबरच रील्स, व्हिडीओ या माध्यमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. अनेकदा त्यांचे कौतुक होते. अनेकदा कलाकारांनादेखील ट्रोल केले जाते. आता ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’फेम ऐश्वर्या नारकर(Aishwarya Narkar) यांनी सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना त्या कशा प्रकारे सामोरे जातात, काय करतात, याबद्दलचे वक्तव्य केले आहे.
ऐश्वर्या नारकर काय म्हणाल्या?
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी नुकतीच आरपार या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत ऐश्वर्या नारकर यांनी सोशल मीडियावरील ट्रोलिंगला ‘विकृती’, असे म्हटले. याबरोबरच कोणी कोणत्या पेजवर काय शेअर करायचे हे ज्याचे-त्याचे व्यक्तिस्वातंत्र्य असल्याचेदेखील अभिनेत्रींनी म्हटले. जेव्हा त्यांना ट्रोलिंग केले जाते, तेव्हा काय करतात, यावर बोलताना ऐश्वर्या नारकर यांनी म्हटले, “मला सुरुवातीला खूप कमेंट्स यायच्या. आता रिअॅक्ट होऊन होऊन त्या एक टक्यावर आल्या आहेत. तर मी बोलते, स्टोरीज टाकते. नॉर्मल बोलायला माझा काहीच प्रॉब्लेम नाही. मी त्यांना उत्तर देते, तुम्हाला नाही आवडलं वगैरे या झोनमध्ये मी असते; पण जर मला डिवचलं, तर मी कोणाला ऐकत नसते. मी नाव घेऊन, कमेंट घेऊन ट्रोल करणाऱ्याला टॅग करते, स्टोरी टाकते. तर याच्या पुढचं मला असं जाणवलंय की, हे केल्यानंतर हे फक्त त्या व्यक्तीला कळतं. त्या व्यक्तीला चार लोक ओळखणारे थोडेच आहेत. मग मी त्याच्या फॉलोअर्समध्ये जाते किंवा त्याला फॉलोइंग करणाऱ्यांमध्ये जाते. मग मला कळतं की, अच्छा हे लोक याला फॉलो करत आहेत. यातील कोणीतरी मित्र असणारच आहे. मग त्यातील चार लोकांना आपण टॅग करायचं. त्यांना कळलं पाहिजे की, त्यांचा मित्र काय दिवे लावतोय. मग हे कुठेतरी थांबेल. मला हे करायचंच आहे. जर पुरुष असतील, तर त्यांच्या बायकांना टॅग करायचं आहे. पण, दुर्दैवानं अशा पुरुषांच्या बायका सोशल मीडियावर सक्रिय नसतात. हे सगळं मला करायचंच आहे. मी गप्प बसत नाही. मी खूप बोलते, मला राग येतो. तुम्ही समोरच्याला गृहीत धरायचं नाही. समोरच्या व्यक्तीवर तुमचा हक्क आहे का?यामध्ये बायकाही खूप असतात.”
दरम्यान, ऐश्वर्या नारकर नुकत्याच सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या होत्या. सोशल मीडियावरदेखील त्या सक्रिय असतात. अनेकदा त्या ट्रोल करणाऱ्यांची कानउघाडणी करतात. त्यांचा चाहतावर्ग मोठा असून, त्यांच्या व्हिडीओ, रील्सना चाहत्यांकडून मोठी पसंती मिळताना दिसते.