अभिनेत्री ऐश्वर्या नारकर सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या ‘झी मराठी वाहिनी’वरील मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. या मालिकेतील ऐश्वर्या यांनी साकारलेली अद्वैतची आई, रुपाली म्हात्रेची (विरोचक) भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतील पडली आहे. या भूमिकेमुळे ऐश्वर्या नारकरांचा वेगळा अवतार पाहायला मिळलंत आहे. मालिकेतील त्यांच्या अभिनयाचं नेहमी खूप कौतुक होतं असतं. अशातच ऐश्वर्या नारकरांनी मँगो कुल्फी झटपट कशी बनवायची? याचा व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे.
ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. फोटो, मजेशीर व्हिडीओ, डान्स व्हिडीओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहतात. अनेकदा त्यांना व्हिडीओमुळे ट्रोल केलं जातं. पण या ट्रोलर्सना ऐश्वर्या नारकर सडेतोड उत्तर देतात. नुकताच ऐश्वर्या यांनी मँगो कुल्फी बनवतानाचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांबरोबर रेसिपी पोस्ट केली आहे.
व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ऐश्वर्या नारकरांनी मँगो कुल्फीची रेसिपी दिली आहे. “साहित्य – दुध, कंडेन्स मिल्क, ड्रायफ्रुट्स आणि आंबा. कृती – आधी दूध उकळवा आणि त्यात कंडेन्स मिल्क घाला. थोडा वेळ उकळून झाल्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट्स पावडर घाला. मग ते घट्ट होईपर्यंत उकळू द्या. त्यानंतर थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक आंबा घ्या आणि त्याचे तुकडे न करता बी काढा. मग आंब्यामध्ये थंड झालेलं मिश्रण टाका. ६ ते ७ तास रेफ्रिजरेट करा. त्यानंतर आंब्याची साल काढून घ्या आणि त्याचे तुकडे करा. तुमची मँगो कुल्फी झाली तयार…” अशा प्रकारे ऐश्वर्या नारकर यांनी झटपट मँगो कुल्फी कशी बनवायची सांगितली आहे.
अभिनेत्री ऐश्वर्या नारकरांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऐश्वर्या नारकरांच्या चाहत्यांनी या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “मला पण पाहिजे”, “व्वा”, “आता सुगरण ऐश्वर्या”, “मस्त”, “मला पण हे खायचं आहे”, “हे खूप भारी आहे”, अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.