बॉलीवूडसह मराठी मनोरंजनविश्वातील सगळेच कलाकार अलीकडच्या काळात सोशल मीडियावर सक्रिय असतात. कामाबरोबरच वैयक्तिक आयुष्यात येणारे असंख्य अनुभव हे कलाकार सोशल मीडियावर शेअर करत असतात. प्रवासादरम्यानचा असाच एक अनुभव छोट्या पडद्यावरच्या लोकप्रिय अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तसेच विमान प्रवास करताना कशी गैरसोय झाली हे देखील अभिनेत्रीने तिच्या पोस्टमध्ये नमूद केलेलं आहे.
‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेमुळे अभिनेत्री अक्षया नाईक घराघरांत लोकप्रिय झाली. या मालिकेने गेल्यावर्षी प्रेक्षकांचा निरोप घेतला तरीही अक्षयाने साकारलेलं लतिका हे पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. सध्या अक्षया तिच्या इतर प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र आहे. नुकतीच ती वैयक्तिक कामानिमित्त गोव्याला गेली होती. यावेळी परतीचा प्रवास करताना अभिनेत्रीची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. यासंदर्भात अक्षया नाईकने सोशल मीडियावर संताप व्यक्त करत काही पोस्ट शेअर केल्या आहेत.
“मोपा विमानतळावरून आमची फ्लाइट बरोबर सायंकाळी ५.२५ वाजता होती. खराब वातावरणामुळे विमान थोडावेळ उशिरा उड्डाण करेल ही गोष्ट मी नक्कीच समजू शकते. पण, इतर सगळ्या विमानांची उड्डाणं चालू होती आणि आम्हाला इथे योग्य ती मदत देखील मिळत नव्हती…कृपया याकडे लक्ष द्या आणि कारवाई करा” अशी पहिली पोस्ट अक्षयाने एका नामांकित विमान कंपनीला टॅग करत लिहिली होती. याशिवाय अभिनेत्रीने या पोस्टवर संताप व्यक्त करणारे इमोजी देखील जोडले आहेत.
अक्षया पुढे लिहिते, “ऑपरेशनल क्रू नव्हता अशी सगळी कारणं देऊन आता विमानाला तब्बल ८ तास उशीर झाला आहे. तसंच आमच्या विमान तिकिटांच्या परतफेडीबाबतही कोणी काहीच बोलत नाहीये.” तब्बल ८ ते ९ तास विमानतळावर घालवल्यावर अभिनेत्री तिच्या पुढच्या स्टोरीमध्ये लिहिते, “आता ९ तासांनी आमच्या विमानाने अखेर मुंबईत लँड केलं आहे. मला सोशल मीडियावर सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद!”
हेही वाचा : शाहरुख खानची प्रकृती आता कशी आहे? जुही चावलाने दिली हेल्थ अपडेट; म्हणाली, “डॉक्टरांनी त्याला…”
अक्षयाप्रमाणे याआधी अनेक मराठीसह बॉलीवूड कलाकारांना देखील अशा घटनांचा सामना करावा लागला होता. ९ तासांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अभिनेत्री अखेर मुंबईत पोहोचली आहे. दरम्यान, तिच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यावर अक्षया रंगभूमीकडे वळली होती. याशिवाय नुकत्याच एका पॉकेट एफएमच्या सीरिजमध्ये ती झळकली आहे.