‘कलर्स मराठी’ वाहिनीवर लवकरच विनोदाचा अ‍ॅटमबॉम्ब फुटणार आहे. ‘फू बाई फू’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, ‘चला हवा येऊ द्या’ यांसारख्या कार्यक्रमानंतर आता ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ हा नवा विनोदी कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या कार्यक्रमातून डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम आणि ओंकार भोजने हे तीन विनोदाचे हुकमी एक्के एकत्र येऊन महाराष्ट्राला खळखळून हसवणार आहेत. या कार्यक्रमाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी सोशल मीडियावर सेटवरील फोटो शेअर केले आहेत.

‘हसताय ना ?हसायलाच पाहिजे!’ या नव्या कार्यक्रमाचं लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशी संपूर्ण धुरा डॉ. निलेश साबळे स्वतः सांभाळणार आहेत. यामध्ये भाऊ कदम, ओंकार भोजनेसह सुपर्णा श्याम , स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण आदी कलाकार पाहायला मिळणार आहेत.

हेही वाचा – दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटेंच्या मुलाचं पार पडलं व्याही भोजन, लवकरच अडकणार लग्नबंधनात

विशेष म्हणजे ‘हसताय ना ?हसायलाच पाहिजे!’ या कार्यक्रमात महाराष्ट्राचे विनोदाचे बादशहा, अत्यंत संवेदनशील गुणी अभिनेते भरत जाधव आणि चार दशकं सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या अलका कुबल हे दोन महान कलाकार दर भागामध्ये सेलिब्रिटी पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला दाद देण्यासाठी लाभणार आहेत. या बहुचर्चित कार्यक्रमाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून अलका यांनी इन्स्टाग्रामवर सेटवरील फोटो शेअर केले आहेत.

पहिल्या फोटोत अलका कुबल यांच्यासह भरत जाधव व निलेश साबळे पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या फोटोत अलका या एका खुर्चीत बसलेल्या पाहायला मिळत आहेत. हे फोटो शेअर करत अलका यांनी लिहिलं आहे, “‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ लवकरच फक्त ‘कलर्स मराठी’वर.”

हेही वाचा – भूषण प्रधानचे ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीबरोबरचे फोटो पाहून नेटकऱ्यांनी दिला लग्नाचा सल्ला, म्हणाले, “जोडी छान आहे…”

दरम्यान, जेव्हा ‘हसताय ना ?हसायलाच पाहिजे!’ या कार्यक्रमाचा पहिला प्रोमो शेअर करण्यात आला होता, तेव्हा कार्यक्रमाची तारीख व वेळ जाहीर करण्यात आली होती. २० एप्रिलपासून शनिवार-रविवार रात्री नऊ वाजता ही तारीख व वेळ जाहीर केली होती. पण काही दिवसांनंतर तारीख व वेळेत बदल करण्यात आला. मात्र बदलेली तारीख व वेळ अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.