दैनंदिन मालिका आणि प्रेक्षकांमध्ये एक वेगळं नातं असतं. त्यामुळे मालिकांमध्ये थोडा जरी बदल झाला तरी त्यावर मोठा परिणाम होता. मग हा बदल वेळेचा असो किंवा कलाकारांचा. मालिकेतील बदलामुळे प्रेक्षक अनेकदा नाराज होतात आणि मालिका पुन्हा बघणं टाळतात. असाच काही बदल काही दिवसांपूर्वी ‘सन मराठी’ वाहिनीवरील एका मालिकेत झाला. या मालिकेतील मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीची अचानक एक्झिट झाली. यामुळे प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला आणि ते नाराजी व्यक्त करू लागले. म्हणून आता या अभिनेत्रीने मालिका सोडण्यामागचं कारण सांगून प्रेक्षकांना नव्या अभिनेत्रीवर तितकंच प्रेम करण्याचं आवाहन केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘सन मराठी’ वाहिनीवरील ही मालिका म्हणजे ‘प्रेमास रंग यावे’. या मालिकेतील मुख्य भूमिका म्हणजेच अक्षरा साकारणारी अभिनेत्री अमिता कुलकर्णीने अचानक ही मालिका सोडली. अमिताची जागा अभिनेत्री अमृता फडकेने घेतली. पण त्यानंतर प्रेक्षकांना अनेक प्रश्न पडले. अमिताला या मालिकेतून का काढलं? तिने ही मालिका का सोडली? असे बरेच प्रश्न विचारले जात आहेत. याच प्रश्नांची उत्तर आता अमिताने एका व्हिडीओच्या माध्यमातून दिलं आहे.

हेही वाचा – Video: धकधक गर्ल माधुरी दीक्षित पती श्रीराम नेनेंसह सिद्धिविनायकाच्या चरणी, निमित्त होतं खास…

अमिताने सोशल मीडियावर एक भावुक व्हिडीओ शेअर करत भलीपोस्ट पोस्ट लिहिली आहे. या व्हिडीओतून अभिनेत्रीने मालिका सोडण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. अमिता म्हणाली, “मी तुम्हा सगळ्यांची लाडकी अक्षरा. तर मी हा व्हिडीओ यासाठी करते की, मला खूप मेसेज येता आहेत. खूप कमेंट वाचल्यात. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे, अक्षराला का काढलं? ती अचानक का गेली? या सगळ्या प्रश्नांची उत्तर मला द्यायची आहेत. तर मला कोणी काढलं नाहीये. हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. काही वैयक्तिक कारणासाठी मी हा निर्णय घेतला आहे. ते कारण असं आहे की, माझे बाबा फार आजारी आहेत आणि त्यांना सध्या माझी खूप गरज आहे.”

पुढे अमिता म्हणाली, “आयुष्यात तुमच्यावर कधी अशी वेळ आली, काम आणि कुटुंब यातून एकाची निवड करावी लागली. तर प्लीज कुटुंबाला प्राधान्य द्या. कुटुंब खूप महत्त्वाचं असतं. आई-वडील, नवरा-बायको, मुलं यांच्याशिवाय आयुष्यात आपण काहीच करू शकणार नाही. यांच्या पाठिंब्यामुळेच आपण पुढे जाऊ शकतो. मग जेव्हा त्यांना गरज आहे, तेव्हा त्यांच्या बाजूने खंबीरपणे उभं राहायला हवं. म्हणून मी हा निर्णय घेतला आहे. मला खूप दुःख होतंय, मी या कामापासून आणि माझ्या या आपल्या माणसांपासून लांब जातेय. कारण या अक्षराला घडवण्यामध्ये खूप लोकांचा वाटा आहे. माझे दिग्दर्शक चंद्रकांत गायकवाड, अनिल राऊत सर, मंदार सर, माझे हेअर, मेकअप, कॉस्टयूम टीम, स्पॉट दादा, लाइट, सेटिंग, डीओपी सर आणि विशेष आभार मानायचे आहेत ते म्हणजे जगदंब प्रोडक्शनला. सावंत दादा, अमोल कोल्हे सर, कार्तिक सर, घनश्याम सर खूप खूप धन्यवाद तुम्ही मला ही संधी दिली. तुमच्या पाठिंब्याशिवाय मी काहीच करू शकले नसते.”

हेही वाचा – Video: आमिर खानची लेक लवकरच बोहल्यावर चढणार, हळदीला झाली सुरुवात, आई रीना दत्ताच्या मराठमोळ्या लूकने वेधलं लक्ष

“‘सन मराठी’ वाहिनीचे देखील खूप खूप धन्यवाद, त्यांनी माझ्यातली अक्षरा बघितली. माझ्यावर विश्वास दाखवला की, मी अक्षराची भूमिका व्यवस्थितरित्या निभावू शकेल. मी माझा पूर्णपणे प्रयत्न केला. पण माझी तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे, जी नवीन अक्षरा आली आहे, तिला माझ्याचं एवढं, माझ्याहूनही जास्त प्रेम द्या. कारण ही मालिका माझी आहे, माणसं माझी आहेत. प्लीज रागवू नका किंवा ही अक्षरा का गेली? या कारणामुळे मालिका बघणं बंद करू नका. ही मनापासून विनंती आहे आणि मला माहित आहे, तुम्ही मला नाराज करणार नाही. जितकं प्रेम मला दिलं तितकं प्रेम नवीन अक्षराला सुद्धा द्याल. आपण लवकर परत भेटू. तोपर्यंत प्लीज आपली काळजी घ्या,” असं अमिता म्हणाली.

अमिताच्या या व्हिडीओवर बऱ्याच कलाकार मंडळीसह तिच्या चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “बाबांची काळजी घे आणि लवकर मालिकेमध्ये परत ये आम्ही तुला मीस करतोय आणि करणार,” अशा आशयाच्या प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress amita kulkarni why exited in premas rang yave serial pps