मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी अभिनयाबरोबरच स्वत:चा व्यवसायदेखील सुरू केला आहे. यात आता ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री अनघा अतुलचा समावेश झाला आहे. अनघा ही पंडित अतुलशास्त्री भगरे यांची मुलगी आहे. ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेमुळे अभिनेत्री घराघरांत लोकप्रिय पोहोचली. या मालिकेत तिने श्वेता या खलनायिकेचं पात्र साकारलं होतं.
‘रंग माझा वेगळा’ मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यावर साधारण महिन्याभरापूर्वी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर अनघाने नवीन हॉटेल सुरू करणार असल्याची घोषणा सोशल मीडियावर केली होती. यानंतर दररोज ती हॉटेलचं इंटिरियर, मेन्यू यासंदर्भात तिच्या चाहत्यांना अपडेट देत होती. अखेर महिन्याभरानंतर अनघाचं नवीन हॉटेल आज सर्वांसाठी खुलं झालं आहे.
हेही वाचा : ‘वीर सावरकर : सिक्रेट फाइल्स’च्या शूटींगला सुरुवात, भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास उलगडणार
अनघाने तिचा भाऊ अखिलेश भगरेच्या साथीने हा नवा व्यवसाय सुरू केला आहे. अभिनेत्रीचं ‘वदनी कवळ’ हे शुद्ध शाकाहारी हॉटेल हॉटेल पुण्यातील डेक्कन परिसरात आहे. याठिकाणी येणाऱ्या खवय्यांना पारंपरिक शाकाहारी थाळीचा आस्वाद घेता येईल असं हॉटेलची पहिली झलक पाहून लक्षात येत आहे. हॉटेलच्या भिंतीवर मोठ्या अक्षरात ‘वदनी कवळ’ असं लिहिण्यात आलं आहे. नावाच्या खालोखाल केळीच्या पानावर मोदक, वरण-भात, कुरडई, अळूवडी, बटाट्याची भाजी, कोशिंबीर, पुऱ्या, दही अशा पदार्थांचा कृत्रिम लोगो अभिनेत्रीने डिझाईन करून घेतला आहे. केळीच्या पानावर सजवलेल्या या सुंदर लोगोने सर्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे.
![anagha atul](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/10/image-60.png?w=492)
![anagha atul starts new vegetarian hotel in pune](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/10/anagha-2.jpg?w=830)
अनघाने काही निवडक मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत या नव्या हॉटेलचा शुभारंभ केला. दरम्यान, अभिनेत्रीच्या नव्या हॉटेलच्या पोस्टनंतर कलाकार मंडळींसह नेटकऱ्यांनी तिच्यावर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.