Marathi Actress Wedding Video : मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. नुकताच ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर तसेच ‘लक्ष्मी निवास’ फेम दिव्या पुगावकरचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय येत्या काही महिन्यात सिद्धार्थ खिरीड, अक्षय केळकर असे अनेक मराठी कलाकार देखील लग्नबंधनात अडकणार आहेत.
सध्या अंकिता-दिव्याबरोबर आणखी एका मराठी अभिनेत्रीच्या लग्नसोहळ्याची चर्चा चालू आहे. इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर करत या अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे.
सचिन पिळगांवकर यांच्या ‘एका पेक्षा एक’ या डान्सिंग रिअॅलिटी शोमुळे घराघरांत लोकप्रिय झालेली सुकन्या काळण लग्नबंधनात अडकली आहे. सुकन्या या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती आणि या शोमुळेच ती नावारुपाला आली. पुढे काही दिवसांनी रिअॅलिटी शो केल्यानंतर तिने अभिनय क्षेत्राकडे आपलं पाऊल वळवत अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. आता वैयक्तिक आयुष्यात सुकन्याने आयुष्याच्या एका नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे.
सुकन्याचा लग्नसोहळा आई-बाबा, जवळचे मित्रमंडळी व नातेवाईकांच्या उपस्थिती पार पडला. “शाळेच्या वर्गातील हास्यापासून ते आयुष्यभराच्या आश्वासनांपर्यंत, आमची प्रेमकहाणी बालपणात सुरू झाली आणि हृदयाच्या प्रत्येक ठोक्यासह ती अधिकच दृढ होत गेली.” असं कॅप्शन देत सुकन्याने तिच्या लग्नाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सुकन्याचा मेहंदी सोहळा, हळद, संगीत, दाक्षिणात्य पद्धतीने पार पडलेलं लग्न, मराठमोळ्या पद्धतीने पार पडलेलं लग्न, लग्नाचं रिसेप्शन याची झलक पाहायला मिळत आहे.
सुकन्याच्या नवऱ्याचं नाव रोशन असं आहे. त्यामुळेच लग्नातील फोटो आणि व्हिडीओवर अभिनेत्रीने ‘कन्याहुईरोशन’ हा विशेष हॅशटॅग वापरल्याचं पाहायला मिळत आहे. या जोडप्याने मराठमोळ्या आणि दाक्षिणात्य अशा दोन पद्धतीने लग्न केलं. सध्या संपूर्ण कलाविश्वातून सुकन्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
दरम्यान, सुकन्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर आता लवकरच सुकन्या ‘द दमयंती दामले’ या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. फेब्रुवारी महिन्यात या नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग पार पडणार आहेत. याशिवाय सुकन्याने ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या नाटकात सुद्धा काम केलेलं आहे.