गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या युक्तीने पैशांची चोरी केली जात आहे. त्यापैकी एक म्हणजे जी सध्या अनेकांच्या बाबतीत घडत आहे. एक अमुक अशा व्यक्तीचा फोन येतो. तो सांगतो, तुझ्या वडिलांकडून किंवा नवऱ्याकडून मी पैसे घेतले होते. त्यांनी तुझ्या बँक अकाऊंटवर परत जमा करायला सांगितले आहेत. अमूक एक रक्कम सांगून त्यापेक्षा दुप्पट रक्कम त्या व्यक्तीकडून पाठवली जाते. बँककडून जसा पैसे जमा झाल्याचा मेसेज येतो तसाच तंतोतंत मेसेच येतो. त्यामुळे यावर अनेकांचा विश्वास बसतो. पण त्यानंतर ती दुप्पट रक्कम चुकून पाठवली असून ती परत करा असं सांगितलं जातं. मग सतत त्या व्यक्तीचा फोन येऊ लागतो. या फसवणुकीला अनेकजण बळी पडतात. पण काही जण वडिलांना किंवा नवऱ्याला फोन करून चौकशी केल्यामुळे या फसवणुकीला बळी पडत नाहीत. असाच फसवणुकीचा प्रकार मराठीतील एका लोकप्रिय अभिनेत्री, लेखिकेबरोबर घडला आहे. हा प्रसंग तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री, लेखिका मुग्धा गोडबोले-रानडे यांच्याबरोबर हा फसवणुकीचा प्रकार घडला. हा संपूर्ण प्रकार त्यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितला. तसंच त्यांना आलेल्या मेसेजचा स्क्रीन शॉट देखील त्यांनी शेअर करून आपल्या लोकांना सतर्क केलं.

हेही वाचा – पृथ्वीक प्रतापचा पहिला चित्रपट ‘डिलिव्हरी बॉय’ पाहून आईची होती ‘ही’ पहिली प्रतिक्रिया, म्हणाली…

मुग्धा गोडबोले-रानडे म्हणाल्या, “५ फेब्रुवारीला दुपारी घडलेला प्रसंग किंवा खरं तर फ्रॉडचा प्रयत्न. मी दुसऱ्या दिवशीच्या लताबाईंवरच्या कार्यक्रमाच्या तालमीत होते. खूप गडबड, मागे वाद्यांचे आवाज. अशात मला एक फोन आला. एक माणूस हिंदी भाषेत म्हणाला की, मी तुमच्या नवऱ्याकडून पैसे घेतले होते. ते म्हणाले आहेत ते पैसे मी तुमच्या अकाऊंटवर परत जमा करावेत. १२,५०० रुपये आहेत. बोलताना तो नवऱ्याच्या नावापुढे सर सर एवढंच म्हणत होता. हे शक्य आहे असं मला वाटलं. पुढे त्याने आधी १०,००० रुपये ट्रान्सफर केल्याचा मेसेज आला आणि मग २५००० रुपये पाठवल्याचा मेसेज आला. त्याच वेळी माझ्या जीपे अकाऊंटवरही मेसेजेस आले. हे सगळं वाऱ्याच्या वेगाने सुरू होतं. आणि मग तो म्हणू लागला की मी चुकून २,५०० च्या ऐवजी २५,०० ट्रान्सफर केले आहेत तर कृपया ते परत करा.”

“मधल्या काळात मी नवऱ्याशी संपर्क केला. त्यानं सांगितलं असं काहीही नाहीये. एकीकडे या माणसाचे सतत फोन येत होते. आता त्याने पैसे परत करा म्हणून धोशा लावला. शेवटी मी त्याला ओरडले. पैसे मिळणार नाहीत म्हणून. त्याने माझ्या नवऱ्याच्या नंबरवर फोन केला. त्याला तो म्हणाला की मी चुकून शर्मा नावाच्या माणसाच्या ऐवजी रानडे आडनावाच्या माणसाच्या बायकोला पैसे दिले आहेत तर ते मला परत करा. माझ्या नवऱ्याने त्याला आधारकार्ड आणि बँक स्टेटमेंटचा स्क्रीन शॉट मागवला. त्यानंतर पुढच्या मिनिटाला माझ्याकडचे मेसेजेस डिलीट झालेले होते. पण मी स्क्रीन शॉट काढून ठेवला होता तो हा खाली दिलेला. त्या क्षणी हे मेसेज बँकेकडून आलेले नाहीत हे आपल्याला कळत नाही. त्याचा ड्राफ्ट तंतोतंत आहे.”

हेही वाचा – Video: शाहिद कपूरच्या गाण्यावर ऐश्वर्या नारकर-अविनाश नारकरांच्या जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल

“माझ्या सुदैवाने मी याला बळी पडले नाही. पण याकडे लक्ष द्या. रोज नवीन पद्धती वापरून कुणीतरी आपल्याकडून आपले कष्टाचे पैसे चोरतो आहे. यांच्याकडे माझा आणि माझ्या नवऱ्याचा नंबर होता. आम्ही समोरा समोर नसू याचाही कदाचित अंदाज होता. डोळे, कान आणि मेंदू २४ तास चालू ठेवणं याला आता पर्याय उरलेला नाही,” असं मुग्धा गोडबोले-रानडे म्हणाल्या.

दरम्यान, मुग्धा गोडबोल-रानडे ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेच्या लेखिका होत्या. आता त्या ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या मालिकेत काम करत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress and writer mugdha godbole ranade share fraud incidence with her pps