झी मराठी वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका दोन वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी नाईक ही आता घराघरांत पोहोचलीय आणि लोकप्रिय झालीय. नुकतीच शिवानीने कलाकृती मीडिया या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला ही मालिका कशी मिळाली. शिवानी ते अप्पीपर्यंतचा प्रवास कसा होता याबद्दल तिने सविस्तर सांगितलं आहे.
शिवानी म्हणाली, “ही माझी पहिली मालिका आहे. याआधी मी स्क्रीनवर कुठेही काम केलेलं नाही आहे. मी लहान मोठे रोल केले नाहीत, मी शॉर्ट फिल्म केली नाही, मी असं काहीही केलेलं नाही. मी फक्त थिएटर (नाटक) केलं होतं आणि ते तर मी आयुष्यभर करत राहेन ते माझं पहिल प्रेम आहे.”
हेही वाचा… प्रेमात पडलेल्या शाहिद कपूरची ‘या’ दोघींनी केलेली फसवणूक; अभिनेता म्हणाला…
शिवानी पुढे म्हणाली, “पण जेव्हा आपण काम करत असतो, तेव्हा आपली इच्छा असते की आपण पुढची पायरी चढली पाहिजे आणि मग मी असं ठरवलं की ही शेवटची एकांकीका असेल. आता यानंतर एकांकीका स्पर्धा आणि यात नको पडायला. मग व्यावसायिक नाटक करुया किंवा मग आता स्क्रिनकडे वाटचाल करुया. आपण मालिका केली पाहिजे असं मला वाटत होतं. पण जेव्हा केव्हाही मालिका हा विषय डोक्यात यायचा ना माझं खूप वर्षांपासून असं ठरलं होतं की मी प्रमुख भूमिका करेन आणि मी झी मराठीचीच मालिका करेन. मला नाही माहित कदाचित ते ब्रह्मांडाने ऐकलं आणि त्यांनी तथास्तू म्हटलंय.”
“माझ ते इतक खरं ठरलंय की पहिल्याच मालिकेत प्रमुख भूमिका मिळावी तेही अप्पीसारखी भूमिका मिळावी. कारण जेव्हा आपण मालिका करतो ही घरातल्या प्रत्येक बाईसाठीची गोष्ट असते. त्या प्रत्येकजणी या ना त्या पात्राशी स्वताला जोडून बघतात. त्यामुळे संसार सांभाळणारी पण काहीतरी धाडसी काम करणारी भूमिका आपण साकारतो तेव्हा आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपला तेवढा अभिमान वाटतो. आपल्यालाही असं वाटत की आपण छान काहीतरी काम करतोय. कुठलंतरी चांगलं सकारात्मक पात्र साकारतोय. ही माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे की मला इतक छान पात्र मिळालं आणि त्यानंतर त्याचे एवढे सारे एपिसोड झाले. ” असं शिवानी म्हणाली.
“जेव्हा पहिला फोन आलेला तेव्हा ती धाकधूक होती. श्वेता मॅडमचा मला फोन आला की अप्पी तू करतेयस हा. त्याच माझ्यापेक्षा जास्त उत्साहित होत्या. ” असंही शिवानीने नमूद केलं.
दरम्यान, शिवानी नाईक सध्या ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेतून प्रेक्षकांच मन जिंकतेय. या मालिकेत शिवानीबरोबर संतोष पाटील, सुनील, परशुराम रोहित, नीलम वाडेकर अशा अनेक कलाकारांच्या निर्णायक भूमिका आहेत.