छोट्या पडद्यावर सध्या सर्वाधिक चर्चेत अभिनेत्री म्हणून अपूर्वा नेमळेकरला ओळखले जाते. ती सध्या बिग बॉसमुळे चर्चेत आहे. अपूर्वा नेमळेकरने झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत काम केले होते. या मालिकेद्वारे ती घराघरात पोहोचली. यात तिने शेवंता हे पात्र साकारले होते. बिग बॉसमुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या अपूर्वा नेमळेकरने नुकतंच तिच्या वडिलांच्या निधनाबद्दल सांगितले आहे. यावेळी ती प्रचंड भावूक झाली.
अपूर्वा नेमळेकरने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती अक्षय केळकरला तिच्या वडिलांबद्दल सांगताना दिसत आहे. यावेळी तिने ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील आठवणीही सांगितल्या आहेत.
आणखी वाचा : शिवसेनेचा पदाधिकारी, ८ वर्षांचे रिलेशन आणि घटस्फोट, जाणून घ्या अपूर्वा नेमळेकरच्या पूर्वाश्रमीच्या पतीबद्दल…
अपूर्वा नेमळेकर काय म्हणाली?
“पाच वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात फोन फार जास्त महत्त्वाच होता. कारण त्यावेळी माझे बाबा सतत आजारी असायचे. त्यावेळी मला नेहमी अशी भीती वाटायची की कधी एखादा महत्त्वाचा इमर्जन्सी फोन आला आणि तो माझ्याकडून राहून गेला तर मी स्वत:ला कधीच माफ करु शकत नाही. त्यावेळी आमच्या मालिकेच्या सेटवर असं होतं की ज्याच्या कोणाचा फोन शूटींगदरम्यान वाजेल त्याला संपूर्ण सेटला पार्टी द्यावी लागेल. माझा फोन अनेकदा वाजला आहे आणि मला पार्टी द्यावी लागलीय. यामागचे एकमेव कारण म्हणजे मी कितीही पार्टी द्यायला तयार आहे, पण मला तो फोन मिस करायचा नाही.
सुदैवाने मी लांब असताना फोन आला नाही. जे काही घडलं ते माझ्या डोळ्यासमोर घडलं. त्यांना जाताना मी माझ्या डोळ्यासमोर पाहिलं. त्यामुळे मी तिथे का नव्हते, माझ्यासमोर का घडलं नाही, मी का काही करु शकले नाही, असं कधी झालं नाही. मी प्रयत्न फार केले पण ते यशस्वी झाले नाहीत.
मला अजूनही कधी कधी स्वप्न पडतात की बाबा गेले. मी दचकून उठते आणि वाईट स्वप्न होतं, वाईट स्वप्न होतं. त्यानंतर मला जाणीव व्हायची की आपल्यात बाबा नाहीच आहेत. आता पाच वर्ष झाली तरीही मी अजून त्याला स्वीकारलेले नाही. गेल्या पाच वर्षात मी अनेकदा या गोष्टी विसरुन जा, यासाठी स्वत:ला समजावलं. पण अजूनही ते शक्य होत नाही”, असे तिने यावेळी म्हटले.
दरम्यान अपूर्वा नेमळेकरने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यावर तिच्या अनेक चाहत्यांनी कमेंट केल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत तिचे सांत्वन केले आहे.