Apurva Nemlekar on Divorce: अपूर्वा नेमळेकर ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे. तिने झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत शेवंता हे पात्र साकारले होते. या मालिकेद्वारे ती घराघरात पोहोचली. याचबरोबर ती बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात सहभागी झाली होती. ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अपूर्वा नेमळेकरने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील कठीण काळाबद्दल खुलासा केला आहे. घटस्फोट, त्यामुळे आलेलं डिप्रेशन यावर तिने भाष्य केलं. तसेच लग्नाच्या निर्णयाबद्दल वडिलांचं न ऐकल्याबाबत तिने त्यांची माफी मागितली आहे.

अपूर्वा नेमळेकरने १० वर्षांच्या अफेअरनंतर २०१४ मध्ये लग्न केलं होतं. लग्नानंतर काही वर्षांनी अवघ्या २६ व्या वर्षा तिचा घटस्फोट झाला होता. तिच्या घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया सुरू होण्याआधी तिने वडिलांना गमावलं. या सगळ्या कठीण प्रसंगाबाबत तिने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. वडिलांचं निधन, घटस्फोट त्यामुळे आलेलं डिप्रेशन या काळात तिला कुटुंबाने साथ दिली, असं ती म्हणाली.

अरबाज पटेलच्या एक्स गर्लफ्रेंडबद्दल थेट ‘तो’ प्रश्न विचारल्यावर निक्की तांबोळी म्हणाली, “ते दोघेही…”

मध्यमवर्गीय अपूर्वाचा जेव्हा घटस्फोट झाला…

“एका मध्यमवर्गीय व्यक्तीबरोबर जेव्हा घटस्फोटासारखी गोष्ट घडते. तेव्हा कोर्ट-कचेऱ्या करण्यात खूप पैसा खर्च होतो. १२५० रुपये शेवटचे माझ्या अकाउंटमध्ये उरले होते. आजही आकडा लक्षात आहे माझ्या. त्या १२५० पासूनचा प्रवास आता २०२४ मध्ये माझ्याकडे स्वतःचा फ्लॅट, अत्यंत महागडी गाडी आहे आणि छान बँक बॅलेन्स आहे. मी हार मानली नाही आणि जे केलं, त्यासाठी मला माझा अभिमान आहे. आज नाहीये उद्या पैसे येतील, असं म्हणत मी काम करत गेले,” असं अपूर्वा नेमळेकर म्हणाली.

हेही वाचा – ‘कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे, काय करतो? अंकिता वालावलकरच्या होणाऱ्या पतीबद्दल जाणून घ्या

अपूर्वाला खरी दुनियादारी कोणी शिकवली?

घरातील सत्य परिस्थिती माहीत असूनही काही मित्रांनी फसवणूक केली, त्यांना कधीच विसरणार नाही, असं अपूर्वाने सांगितलं. घटस्फोटाबाबत म्हणाली, “ज्याच्यावर जिवापाड प्रेम केलं, १० वर्षांचं अफेअर होतं आमचं आणि त्यानंतर लग्न केलं होतं. छोटी गोष्ट नाहीये ही आणि त्यानंतर घटस्फोट झाला. आता आठ वर्षे झाली मी सिंगल आहे. लोकांना असं वाटतं शेवंता सिंगल आहे? हो आहे. कारण मनापासून हर्ट झालं की तुम्ही वेळ घेता. तुम्ही पळवाट नाही शोधू शकत. त्यासाठी स्थिरता लागते आणि ती माझ्यात आहे. मी आता त्या पद्धतीने स्वतःला विकसित केलंय. या सर्व लोकांचे मी आभार मानते, ज्यांनी मला या परिस्थितीत टाकलं जिथे यशस्वी होण्याशिवाय आणि काहीतरी करून दाखवण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता.”

हेही वाचा – Video: “तू माझी हिरोईन आहेस”, सूरज चव्हाणला भेटायली आली ‘ती’; नेटकरी म्हणाले, “हीच आमची वहिनी शोभेल”

वडिलांना काय म्हणाली अपूर्वा?

अपूर्वाच्या वडिलांचं निधन झालंय, जे मनातलं त्यांच्याशी बोलायचं राहून गेलं होतं ते तिने सांगितलं. “पप्पा, तुम्ही आहात तिथे छान आणि सुखात आहात. जो त्रास व्हायचा त्यातून मुक्त झाला असाल. तुमच्या आणि मम्मीच्या नात्याने बरंच काही शिकवलं मला. कदाचित म्हणून लोक माझ्याकडे ओल्ड स्कूल म्हणून बघतात. प्रेमाची खरी व्याख्या तुमच्याकडून कळली. जोडीदार कसा असायला पाहिजे, याबद्दल कदाचित तुमच्याकडे बघून माझ्या अपेक्षा वाढल्या. तुमची माफी मागायची आहे. ते सॉरी कदाचित बोलायचं राहून गेलं. तो दिवस आजही आठवतो. मला एक गोष्ट कळली होती आणि ती सांगायची होती, मग मी टाळली आणि उद्या बोलूयात असं म्हटलं. तुमच्या लग्नाचा ३६ वा वाढदिवस होता आणि हा शेवटचा ठरेल असं मला वाटलं नव्हतं,” असं अपूर्वा म्हणाली.

सूरज चव्हाणला जिंकवणं हा सहानुभूतीचा खेळ? केदार शिंदेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाले, “तो छक्के-पंजे…”

“मी कायम तुमचं सगळं ऐकलं आणि एक गोष्ट तुम्ही मला सांगितली की नको करूस.. कदाचित तुमचं ऐकलं असतं तर आज एकटी नसते. तुम्ही बरोबर होतात. कदाचित तुम्हाला बाप म्हणून दिसलं होतं आधीच आणि म्हणून असं वाटतं की प्रत्येक मुलीने आपल्या बाबांचं ऐकावं. तुमचं सगळं ऐकलं पण हे का नाही ऐकलं, याची याची खंत आयुष्यभर राहील. चुकले मी, तुम्ही बरोबर होतात. जोडीदार निवडताना चूक केली. त्याचं दुःख नाही मला, पण त्यानंतर जर तुम्ही माझ्या बरोबर राहिला असतात तर ती खंत भासली नसती. ते सॉरी म्हणायचं राहून गेलं. मी सावरण्याचा खूप प्रयत्न केला, चांगलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतेय. आईची काळजी घेतेय. भावाची जितकी घेऊ शकले तितकी घेतली. मात्र काही गोष्टी माझ्या हातात नव्हत्या. आता तो तुमच्याबरोबर आहे, तुम्ही त्याची काळजी घेत असाल. माझ्यावर योग्य संस्कार केलेत तुम्ही त्यासाठी थँक्यू. तुम्ही खरं वागायला शिकवलं मी तसंच वागते. पुन्हा एकदा सॉरी, मी चुकले, मी तुमचं ऐकायला हवं होतं,” असं रडत अपूर्वा म्हणाली.

अपूर्वा नेमकळेकरचा पूर्वाश्रमीचा पती कोण?

अपूर्वा नेमळेकरच्या पूर्वाश्रमीच्या पतीचे नाव रोहन देशपांडे असे होते. तो शिवसेनेचे पदाधिकारी होता. दोघांचा प्रेमविवाह झाला होता. मात्र त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही.