पडद्यावर दिसणारे कलाकार हे अनेकदा सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे सतत चर्चेत असतात. कलाकारांनी शेअर केलेले फोटो, व्हिडीओ चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. फोटोंना दिलेल्या कॅप्शनदेखील लोकांना आवडल्याचे अनेकदा पाहायला मिळते. आता ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे(Ashwini Mahangade) सध्या तिने शेअर केलेल्या फोटोंमुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
अभिनेत्री अश्विनी महांगडे फोटो शेअर करीत काय म्हणाली?
अभिनेत्री अश्विनी महांगडेने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला असून, त्यामध्ये ती अत्यंत सुंदर दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. फोटो शेअर करीत अश्विनीने लिहिले, “विद्या विसरावी, चाक रुतावं, कवचकुंडलं काढून घ्यावीत. तरीही हिमतीनं रणांगणावर ठाम उभं राहावं अन् तेही हसत”, अशी कॅप्शन दिली आहे. तिच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी हार्ट इमोजी शेअर करीत प्रेम व्यक्त केले आहे.
अश्विनी महांगडे तिच्या कलाकृतींबरोबरच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. अनेकदा ती तिच्या जवळच्या माणसांबद्दल भरभरून लिहिताना दिसते. त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करते. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने तिची आई कुठे काय करते मालिकेतील सहकलाकार कौमुदी वलोकरच्या केळवणाबद्दल लिहिले होते, त्याला प्रेक्षकांचे प्रेम मिळताना दिसले. मालिकेतील सहकलाकारांनी एकत्रित कौमुदीचे केळवण केले होते.
अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचे, तर ती नुकतीच ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत दिसली होती. या मालिकेत तिने अनघाची भूमिका साकारली होती. अनघाने अरुंधतीला कायम साथ दिली होती. तिची ही भूमिका प्रेक्षकांना आवडली असल्याचे पाहायला मिळाले होते. या लोकप्रिय मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. याआधी अश्विनीने मालिका व चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता अश्विनी महांगडे ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.