चित्रपट, नाटक, मालिका या सर्वच माध्यमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री अतिशा नाईक. मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जाते. ‘आभाळमाया’, ‘घाडगे अँड सून’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत ती झळकली. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत तिने साकारलेली इंदुमतीची भूमिका प्रचंड गाजली होती. मात्र तिने ही या मालिकेला अचानक रामराम केला. आता तिने त्यामागचे कारण सांगितले आहे.
‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत अतिशा नाईकने अभिमन्यूच्या आई इंदुमतीची भूमिका साकारली होती. या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं होतं. मात्र तिने अचानक ही मालिका अर्धवट सोडली होती. आता नुकतंच तिने ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिका सोडण्यामागचा खुलासा केला आहे.
आणखी वाचा : “…तर माझ्या आईच्या चारित्र्यावर शिंतोंडे उडले असते”, रंगावरुन होणाऱ्या भेदभावावर मराठी अभिनेत्रीने मांडलं स्पष्ट मत, म्हणाल्या “गोरं व्हायचं क्रीम…”
“मी आईसाठी ही मालिका सोडली होती. माझी आई ८६ वर्षाची होती, जी आता या जगात नाही. त्यावेळेस आई खूप आजारी असायची. एकतर म्हातारपण, त्यात दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची स्थिती येते. तेव्हा मला वाटलं की, मी तिथे असायला पाहिजे.
लॉकडाऊन काळात मालिकेचं शूट सुरु होते. त्यानिमित्ताने जवळपास सव्वा ते दीड वर्ष मी नाशिकमध्ये राहिले होते. ज्यावेळेला मी मुंबईला जायचे, तेव्हा मी नेहमी आईला भेटायला यायचे. पण नंतर माझ्या लक्षात आलं की जेव्हा मी महिन्याभराने घरी यायचे, तेव्हा एक महिन्याची आई एक वर्षाची म्हातारी झाल्यासारखे वाटायचे. जशी मुलं पटकन मोठी होतात तशी.
त्यामुळे आता जर मी इथे नसेन तर नंतर आपण इथे असायला पाहिजे होतं, याचा मला नेहमी पश्चाताप झाला असता. आई म्हणून ती माझी गरज आहे, मी मुलगी म्हणून तुझी गरज नाही हे तिला दाखवून द्यावं लागायचं. त्यामुळे तिला एकटेपणा जाणवू न देता तिच्या आजूबाजूला कसं राहता येईल, यासाठी मी ही मालिका सोडली होती, असे अतिशा नाईकने म्हटले.
दरम्यान अतिशा नाईकने आपल्या कारकिर्दीत अनेक विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. चित्रपट, नाटक, मालिका, रिऍलिटी शो या सर्वच माध्यमांतून अतिशाने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. केवळ मराठीच नव्हे, तर हिंदी मनोरंजनसृष्टीत तिने तिच्या अभिनय कौशल्याची वेगळीच छाप पाडली आहे.