‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील गाजलेल्या मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘फुलाला सुगंध मातीचा’. दोन वर्ष या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या मालिकेचं कथानक, कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांचा चांगला पसंतीस उतरला होता. ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतील किर्ती व शुभमची जोडी हीट झाली होती. आता या मालिकेत झळकलेली एक अभिनेत्री ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये पाहायला मिळणार आहे.
काही दिवसांपूर्वी ‘फुलाला सुगंध मातीचा’मधील जीजीअक्का म्हणजे अभिनेत्री अदिती देशपांडे यांची ‘लग्नाची बेडी’ या मालिकेत दमदार एन्ट्री झाली. त्यानंतर आता ‘फुलाला सुगंध मातीचा’मध्ये दिशाच्या भूमिकेत झळकलेली अभिनेत्री भाग्यश्री दळवी ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत दिसणार आहे. यासंदर्भात तिने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे.
भाग्यश्रीने मेकअप रुममधला व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे, “निकिता बनून माझा नवीन प्रवास सुरू होतं आहे. नवीन मालिका, नवीन टीम, नवीन काम….गणपती बाप्पा मोरया…बघायला विसरू नका ‘घरोघरी मातीच्या चुली'” अभिनेत्रीच्या या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
हेही वाचा – Video: निलेश साबळेंच्या ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ कार्यक्रमाचं शीर्षकगीत प्रदर्शित, पाहा व्हिडीओ
भाग्यश्रीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने याआधी बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘खरंच तिचं काय चुकलं?’, ‘दार उघड बये’, ‘सांग तू आहेस का?’, ‘भाग्य दिले तू मला’, अशा बऱ्याच मालिकांमध्ये भाग्यश्री विविधांगी भूमिकेत झळकली.
दरम्यान, ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका १८ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीस आली. अल्पावधीत या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे. अभिनेत्री रेश्मा शिंदे, सुमीत पुसावळे, सविता प्रभुणे, प्रमोद पवार, उदय नेने, आरोही सांबरे अशा अनेक कलाकारांची मांदियाळी मालिकेत पाहायला मिळत आहे.