भार्गवी चिरमुले ही मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मालिका, नाटक, चित्रपटा यांच्या माध्यमातून भार्गवीनं आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनयाबरोबर भार्गवी एक उत्तम नृत्यांगनाही आहे. सोशल मीडियावर भार्गवी नेहमी सक्रिय असते. भार्गवीने २५ फेब्रुवारी २०१२ ला पंकज एकबोटेबरोबर लग्नगाठ बांधली; पण लग्नाच्या काही काळानंतर दोघे वेगळे झाले. दरम्यान, एका मुलाखतीत भार्गवीने घटस्फोटाबाबत भाष्य केले आहे.
नुकतीच भार्गवीने ‘मीडिया टॉक मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत भार्गवीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबात अनेक घटनांचा खुलासा केला आहे. भार्गवी म्हणाली, “माझा घटस्फोट झाला आहे. सध्या मी सिंगल वूमन आहे, पण मागे वळून बघताना मला असं वाटतं की, मी एकटी असले म्हणून काय झालं मी आनंदी आहे आणि माझ्या आजूबाजूचेही सगळे आनंदी आहेत.”
भार्गवी पुढे म्हणाली, “माझ्या आयुष्यात जे झालं ते झालं; पण मी कुणालाही त्रास दिला नाही. मी पुढे गेले आहे. मला हवं ते आणि हवं तसं मी काम करतेय. प्रत्येकाला तसा आनंद मिळत नाही. मी इतका मोठा समुद्र पार केलाय. त्यामुळे आता कशाचीही भीती वाटत नाही.”
हेही वाचा- ‘माझा होशील ना’नंतर विराजस कुलकर्णी व गौतमी देशपांडे पुन्हा झळकणार एकत्र; निमित्त मालिका नव्हे तर….
भार्गवीच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर ‘वहिनीसाहेब’, ‘आई मायेचा कवच’ या मालिकांमधील भार्गवीची भूमिका चांगलीच गाजली. मालिकांबरोबर भार्गवीने अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. भार्गवीच्या ‘वन रूम किचन’, ‘संदूक’ या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अभिनयाबरोबर भार्गवीने योगाचे प्रशिक्षणही घेतले आहे. नुकतेच भार्गवीने स्वत:चे यूट्युब चॅनेल सुरू केले आहे.