गेल्या काही महिन्यांपासून मराठी मालिकाविश्वात नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. काही आठवड्यांपूर्वी ‘कलर्स मराठी’वर महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांची नवी मालिका सुरू झाली. ‘अशोक मा.मा.’ असं मालिकेचं नाव असून २५ नोव्हेंबरपासून रात्री ८.३० ही मालिका प्रसारित होत आहे. या मालिकेत अशोक सराफ यांच्यासह अभिनेत्री नेहा शितोळे, रसिका वाखारकर, शुभावी गुप्ते, आशिष कुलकर्णी असे बरेच कलाकार मंडळी पाहायला मिळत आहेत.
‘अशोक मा.मा.’ ही ‘कलर्स मराठी’ची मालिका अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील अशोक मा.मा., ईरा, ईशान, भैरवी, फुलराणी ही पात्र आता घराघरात पोहोचली आहेत. पण, अशातच या मालिकेतील एका अभिनेत्रीची एक्झिट झाली आहे. याबाबत तिने स्वतः सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे.
अभिनेत्री चैत्राली लोकेश गुप्तेची ‘अशोक मा.मा.’ मालिकेतून एक्झिट झाली आहे. या मालिकेत चैत्रालीने पल्लवीची भूमिका साकारली होती. पण या भूमिकेचा प्रवास संपला आहे. त्यामुळे चैत्रीली गुप्तेची ‘अशोक मा.मा.’ मालिकेतून एक्झिट झाली आहे.
चैत्राली गुप्ते पोस्ट करत म्हणाली, “अशोक मा.मा…सुखद अनुभव…खूप वर्षांनी मराठी मालिकेमध्ये काम केलं आणि त्याचा अनुभव हां खूप सुखद आणि आनंददायी होता…एकतर महाराष्ट्राचे महानायक अशोक सराफ अर्थात आपल्या सगळ्यांचे लाडके अशोक मामा त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी , स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली; ज्याचे खूप दडपण होते आणि उत्सुकता पण होती…अशोक मामा एक महान नट तर आहेतच पण एक उत्तम माणूस आहेत हे खूप जवळून अनुभवता आले. थँक्यू मामा.”
पुढे चैत्रालीने लिहिलं की, शुभावी, निआ, स्वराज, आशिष, नेहा या सगळ्यांबरोबरच काम करताना खूपच मजा आली…केदार वैद्य तुझ्याबरोबर खूप वर्षांनी काम केलं त्यामुळे जुने दिवस आठवले. थँक्यू केदार शिंदे, कलर्स मराठी. तसंच निवेदिता सराफ यांची मी आभारी आहे. त्यांनी मला पल्लवी भूमिका साकारण्यासाठी प्रोत्साहन दिलं. आणि सगळ्यात जास्त आभार माझ्या प्रेक्षकांचे, ज्यांनी माझ्यावर आणि पल्लवीवर खूप प्रेम केलं. सगळ्यांचे खूप खूप आभार…लवकरच भेटूया एका नवीन भूमिकेत एका नवीन मालिकेत आणि हो पल्लवी तुम्हाला अधून मधून भेटायला येईलच.