झी मराठीवरील ‘तू चाल पुढं’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. या मालिकेतील सर्वच पात्र घराघरात पोहोचले आहेत. अंकुश चौधरीची पत्नी दीपा परब-चौधरी ही प्रमुख भूमिकेत दिसत आहे. या मालिकेच्या निमित्ताने तिने दीर्घ काळाने मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं. नुकतंच तिने या मालिकेसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
‘तू चाल पुढं’ ही मालिका १५ ऑगस्ट २०२२ रोजी सुरु झाली. या मालिकेतील प्रत्येक पात्राने घराघरात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. या मालिकेला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं. त्यानिमित्ताने अभिनेत्री दीपा चौधरीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात तिने या मालिकेबद्दल भाष्य केले आहे.
आणखी वाचा : “…बस इतकेच”, सुश्मिता सेनची ‘ताली’ वेबसीरिज पाहिल्यानंतर सुबोध भावेची पोस्ट, म्हणाला “रवी जाधव तुझ्या…”
दीपा परबची पोस्ट
“आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन त्याचप्रमाणे आज झी मराठीचा वर्धापन दिन देखील आहे. माझ्यासाठी हा दिवस आणखीन एका गोष्टीसाठी खूप खास आहे कारण आज पासून एक वर्षापूर्वी १५ ऑगस्टलाच ‘तू चाल पुढं’ या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता दीपा, अश्विनी बनून एका नवीन रूपात तुम्हा सर्वांच्या भेटीस आली होती. खूप कमी वेळात तुम्ही सर्वांनी तिला ‘तू चाल पुढं’ म्हणत आपलंसं करून घेतलं. आणि खऱ्या अर्थाने तिला दाही दिशांनी सुखाने साद घातली गेली. झी मराठीचा विश्वास, झी स्टुडिओचा पाठिंबा आणि तुम्हा सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांच्या भरभरून प्रेम आणि उदंड प्रतिसादामुळे अश्विनीचा स्वतंत्र होत स्वप्नांच्या दिशेने भरारी घेण्याचा प्रवास निर्विघ्नरित्या सुरू आहे.
माझ्यावर संपूर्णपणे विश्वास ठेवून ‘अश्विनी’ सारख्या एका खंबीर गृहिणीचे नेतृत्व छोट्या पडद्यावर साकारण्याची संधी मला दिली याबद्दल झी मराठी आणि झी स्टुडिओजचे मनःपूर्वक धन्यवाद. तुमचे हे प्रेम सदैव असेच पाठीशी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना”, असे दीपा परबने यात म्हटले आहे.
दरम्यान दीपा परब चौधरी हिने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये उत्तमोत्तम काम करत प्रेक्षकांना आपलसं केलं. झी मराठी वाहिनीवरील ‘तू चाल पुढं’ या मालिकेच्या निमित्ताने तिने बऱ्याच वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक केलं. या मालिकेमधील ती साकारत असलेली गृहिणीची भूमिका सध्या चर्चेत आहे. या भूमिकेने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ती सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते.