छोट्या पडद्यावर सातत्याने प्रसिद्धीझोतात असलेली मालिका म्हणून ‘आई कुठे काय करते’ या मालिकेकडे पाहिलं जातं. या मालिकेतील कलाकार हे सतत चर्चेत असतात. याच मालिकेद्वारे अभिनेत्री दिपाली पानसरेने मालिका विश्वात दमदार कमबॅक केले. या मालिकेत तिने संजनाची व्यक्तीरेखा साकारली होती. मात्र करोना काळात तिला ही मालिका सोडावी लागली. नुकतंच दिपालीने याबद्दल भाष्य केले आहे.
दिपाली पानसरे ही लवकरच एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ असे तिच्या या नव्या मालिकेचे नाव आहे. या मालिकेत ती महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असल्याचे बोललं जात आहे. यानिमित्ताने दिपालीने राजश्री मराठी या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून एक्झिट घेण्याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर तिने स्पष्टपणे भाष्य केले.
आणखी वाचा : “…तर त्यांनी मला नक्कीच बसवलं असतं”, अशोक सराफ यांना सुनावणाऱ्यांवर भडकले भाऊ कदम, म्हणाले “कृपया…”
“मी सिनेसृष्टीत कमबॅक करण्यासाठी प्रचंड वाट पाहिली. मी ज्या मालिकेत काम करत होती ती माझी बाळ झाल्यानंतर कमबॅक असलेली मालिका होती. माझा मुलगा रुहान ३ वर्षांचा होईपर्यंत मी काहीच काम केलं नाही. त्यानंतर मग मला त्या मालिकेच्या निमित्ताने छान ब्रेक मिळाला. मी आनंदात होते.
पण त्याचवेळी अचानक करोना सुरु झाला. अनेक वृत्तांमध्ये असं झळकत होतं की याचा सर्वात मोठा धोका हा लहान मुलं आणि वृद्धांना होऊ शकतो. त्यामुळे मी ही मालिका सोडली. मला मालिका सोडण्याचा तो निर्णय घेणं खूप अवघड गेलं. पण मला असं वाटतं की हे एक आईच करु शकते. त्यातही माझं माझ्या कामावर इतकं प्रेम आहे. मला काम करायला खूप आवडतं. पण मी तेव्हा घराबाहेर जाणार नाही, असा निर्णय घेतला. कारण बाकी कोणीही घराबाहेर जात नव्हतं आणि माझ्यामुळे करोना घरात यायला नको होता, यामुळे मी तो निर्णय घेतला. तो निर्णय घेणं फार सोपं नव्हतं. पण रुहानमुळेच मला बळ मिळालं”, असे दिपाली पानसरे म्हणाली.
दरम्यान, दिपालीने अनेक मराठी तसेच हिंदी मालिकांमध्ये काम केलं. दिपालीने हम लडकिया या मालिकेद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर ती ‘दिल मिल गये’, ‘अदालत’, ‘इस प्यार को क्या नाम दू’ यांसारख्या अनेक हिंदी मालिकांमध्ये झळकली. दिपालीला ‘देवयानी’ मालिकेमुळे खरी प्रसिद्धी मिळाली. आता लवकरच दिपाली ही ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेत झळकणार आहे.