Marathi Actress New Home : छोट्या पडद्यावर काम करणारे कलाकार अल्पावधीतच घराघरांत लोकप्रिय होतात. ‘झी मराठी’वर काही वर्षांपूर्वी ‘तुझ्यात जीव रंगला’ ही राणादा अन् पाठकबाईंची मालिका सुरू होती. या मालिकेतील मुख्य कलाकारांप्रमाणे आणखी एक अभिनेत्री घराघरांत लोकप्रिय झाली ती म्हणजे या मालिकेची खलनायिका धनश्री काडगावकर. ‘तुझ्यात जीव रंगला’मुळे तिला घराघरांत ‘वहिनीसाहेब’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं.
धनश्री तिच्या करिअरबरोबरच वैयक्तिक आयुष्यातही भरारी घेताना दिसत आहे. अभिनेत्रीने गेल्यावर्षी ठाण्यात दोन नवीन घरं खरेदी केली. ठाणे पश्चिम भागात धनश्रीने एकाच मजल्यावर दोन फ्लॅट खरेदी करत आपली स्वप्नपूर्ती केली होती. मुंबई-ठाण्यासारख्या शहरात घर खरेदी करणं ही आजच्या घडीला खूप मोठी गोष्ट समजली जाते. त्यात धनश्रीने दोन घरं खरेदी केल्यामुळे इंटिरिअरसाठी येणारा खर्च वेगळा होता. त्यामुळे घर घेतल्यावर काही महिने वेळ घेऊन अभिनेत्रीने सुंदर असं इंटिरिअर करुन घेतलं.
मराठी अभिनेत्रीच्या घराची हटके नेमप्लेट
धनश्रीने प्रवेशद्वाराच्या इंटिरिअरसाठी पांढऱ्या आणि रोज गोल्ड रंगाची थीम निवडली आहे. तर, तिच्या दाराच्या बाजूला असणारी नेमप्लेट सर्वांचं लक्ष वेधून घेते. यावर अभिनेत्रीचं आणि तिच्या नवऱ्याचं ‘धनश्री दुर्वेश’ असं नाव लावण्यात आलं आहे. आपलं हक्काचं घर असावं अशी अभिनेत्रीची अनेक वर्षांपासूनची इच्छा होती, ती या दोन्ही फ्लॅट्समुळे पूर्णत्वास आली आहे.
धनश्रीने मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर आपल्या नव्या घराच्या इंटिरिअरची पहिली झलक चाहत्यांबरोबर शेअर केली. या व्हिडीओवर नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. याशिवाय अनेकांनी धनश्रीजवळ “संपूर्ण होम टूर व्हिडीओ कर” अशी मागणी देखील चाहत्यांनी केली आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने घरासाठी व्हाइट आणि रोज गोल्ड थीम वापल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, दरम्यान धनश्रीने झी मराठीच्या तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील वहिनीसाहेब भूमिकेनंतर ‘तू चाल पुढे’मध्ये शिल्पी हे पात्र साकारलं होतं. लेकाच्या जन्मानंतर धनश्रीने काही महिन्यांपूर्वी मोठ्या ब्रेकनंतर पुनरागमन केलं. अभिनेत्रीच्या मुलाचं नाव कबीर असं आहे.