‘आई कुठे काय करते'(Aai Kuthe Kay Karte) ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. या मालिकेचे चित्रीकरण नुकतेच संपले असून, त्यामध्ये काम करणारे कलाकार काही दिवसांपासून मुलाखती, सोशल मीडिया आणि इतर माध्यमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आता अभिनेत्री गौरी कुलकर्णी(Gauri Kulkarni)ने सोशल मीडियावर आई कुठे काय करते या मालिकेत काम करण्याचा अनुभव आणि मालिका संपल्यानंतरच्या भावना सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करीत व्यक्त केल्या आहेत.
काय म्हणाली गौरी कुलकर्णी?
अभिनेत्री गौरी कुलकर्णीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. तिने शेअर केलेल्या व्हिडीओच्या सुरुवातीला तिची ऑडिशन पाहायला मिळत आहे. त्यात ती म्हणते, तुम्ही यशला ओळखता ना? मी त्याच्याच समोरच्या बिल्डिंगमध्ये राहते. पुढे मालिकेतील इतर कलाकारांबरोबर तिचे फोटो पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना अभिनेत्रीनं लिहिले, “ऑडिशनला घातलेला ड्रेस परत फेअरवेलला घातला. कारण- गौरीतली ‘गौरी’ कायम माझ्यासोबतच होती. आज निरोप देताना इमोशनलसुद्धा वाटतंय आणि आनंदही होतोय. या शोनं मला सर्व दिलं. ओळख दिली. खूप चांगली माणसं दिली, अनेक अनुभव दिले आणि तुमचं भरभरून प्रेम दिलं. आयुष्याच्या वहीत दुमडून ठेवलेलं खुणेचं पान म्हणजे माझ्यासाठी ‘आई कुठे काय करते’ ही सीरियल होती आणि राहील”, असे लिहित गौरीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
गौरीने या मालिकेत गौरी हे पात्र साकारले होते. संजनाची भाची आणि नंतर यशची मैत्रीण झालेल्या गौरीने तिच्या प्रेमळ स्वभावाने सर्वांची मने जिंकल्याचे पाहायला मिळाले. संजनाची भूमिका ही नकारात्मक दाखविली असली तरी तिच्या भाचीची म्हणजेच गौरीची ही भूमिका अत्यंत सकारात्मक असल्याचे दिसून आले.
‘आई कुठे काय करते’ मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांची मने जिंकली. मग ती भूमिका सकारात्मक किंवा नकारात्मक असो. प्रत्येक कलाकाराने त्याच्या अभिनयाद्वारे स्वत:च्या भूमिकेला न्याय दिला आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केले. पाच वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत असल्याचे पाहायला मिळत होते. आता ही मालिका निरोप घेणार असून प्रेक्षकांसह कलाकारही भावूक झाल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
हेही वाचा: Video : डॉक्युमेंटरीच्या मोठ्या वादानंतर धनुष आणि नयनतारा यांची एकाच सोहळ्याला उपस्थिती, पण…
दरम्यान, या मालिकेत मिलिंद गवळीने अनिरुद्धची भूमिका साकारली आणि मधुराणी प्रभुलकर व रूपाली भोसले यांनी अनुक्रमे अरुंधती व संजना यांच्या भूमिका निभावल्या होत्या. त्याबरोबरच अभिषेक देशमुख हा यशच्या भूमिकेत आणि अपूर्वा गोरे ही ईशाच्या भूमिकेत दिसली. मालिकेबरोबरच हे कलाकार फोटो, व्हिडीओ व रील्स यांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. आता या मालिकेनंतर हे कलाकार कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.