स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्वच मालिका लोकप्रिय आहेत. यातील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. सध्या ही मालिका टीआरपीमध्ये पहिल्या क्रमांकावर असल्याचे पाहायला मिळत आहे. या मालिकेत काही दिवसांपूर्वी अभिनेत्री गायत्री दातारची एंट्री झाली. गायत्री ही या मालिकेत रुही कारखानीस हे पात्र साकारताना दिसत आहे. तिच्या या पात्राला प्रेक्षकही चांगला प्रतिसाद देताना दिसत आहे.
‘तुला पाहते रे’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणून गायत्री दातार हिला ओळखले जाते. तिने या मालिकेत ईशा ही भूमिका साकारली होती. तिने अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत तिची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यानंतर तिने ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमात सुद्धा विनोदी भूमिका साकारली होती. त्यानंतर ती ‘बिग बॉस मराठी’मध्ये झळकली. यानंतर मात्र गायत्रीने कलाविश्वातून ब्रेक घेतला. नुकतंच तिने यामागचे खरं कारण सांगितले आहे.
आणखी वाचा : “मी यापुढे पायाखालून कमरेपर्यंत साडी वर करेन आणि…” गौतमी पाटीलच्या लावणीवर मेघा घाडगे संतापली
एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत गायत्रीला छोट्या पडद्यावरील न झळकण्यामागचे कारण काय? असा प्रश्न विचारला होता. त्यावर तिने सविस्तरपणे उत्तर दिले. यात ती म्हणाली, “मी पुढे काही काळ मालिका करणार नाही, असे ठरवले होते. त्यावेळी मला अनेक संधीही येत होत्या. मला सातत्याने अनेक मालिकेतील भूमिकांसाठी विचारणाही केली जात होती. मात्र एकदा मालिका सुरू केली की ती खूप वर्ष चालते.”
“मला वेगवेगळ्या गोष्टी करून बघायच्या होत्या, म्हणून मी ठरवलं होतं की थोडे दिवस मालिका करायची नाही. पण या मालिकेतील ही संधी मला खूप छान वाटली. यात माझी खूप वर्ष जाणार नाहीत. तसेच, मला आता तेवढी वर्ष वायाही घालावायची नाहीत. यादरम्यान मला अनेक चाहत्यांचे मेसेज येत होते. तू आम्हाला परत मालिकेत कधी दिसणार, तू मालिकेत कधी काम करणार, असे अनेक प्रश्न मला माझे चाहते विचारत होते. त्यामुळे ही मालिका तीन चार महिन्यांसाठी करायला काय हरकत आहे, असा विचार करुन मी यासाठी होकार दिला. ही माझ्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे”, असे गायत्री दातारने म्हटले.
आणखी वाचा : “मला शिष्य म्हणून…” गौतमीमुळे सुपाऱ्या बंद झाल्या म्हणणाऱ्याला मेघा घाडगेचे सडेतोड उत्तर
दरम्यान ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत सध्या नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. या मालिकेने सहा वर्षांचा लीप घेतला आहे. या लीपनंतर मालिकेच्या कथानकात अनेक बदल करण्यात आले आहेत. सहा वर्षांच्या लीपमध्ये जयदीप आणि गौरी एकमेकांपासून दुरावताना दिसले आहेत. गौरी आणि जयदीप यांना लक्ष्मी नावाची मुलगी आहे. तर, गौरी जयदीप आणि लक्ष्मीची आतुरतेने वाट पाहतेय. तर दुसरीकडे, एका आलिशान बंगल्यात जयदीप आणि त्यांची मुलगी लक्ष्मी एकत्र राहताना दिसत आहेत. त्यामुळे मालिका नेमकं कोणतं वळण घेतेय, गौरी आणि जयदीपची भेट होईल का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तसेच गायत्री दातार साकारत असलेल्या रुही कारखानीसच्या भूमिकेमुळे मालिकेत कोणता नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.