मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या आणि सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे हेमांगी कवी. तिने नाटक, मालिका, चित्रपट, ओटीटी यांसारख्या चारही माध्यमातून अभिनयाचा ठसा उमटवला. हेमांगी कवी ही सध्या एका जाहिरातीमुळे चर्चेत आहे. या जाहिरातीत हेमांगी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. आता तिने याचा अनुभव शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेमांगी कवीने नुकतंच ‘महाराष्ट्र टाईम्स’ या वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्याचा तिचा अनुभव कसा होता, याबद्दल सांगितले. यावेळी तिने ऑडिशन, त्यासाठी केलेला सराव आणि चित्रीकरण याबद्दल भाष्य केले.
आणखी वाचा : शिवाजी साटम यांची सून आहे प्रसिद्ध अभिनेत्री, सासऱ्यांबद्दल खुलासा करत म्हणाली “लग्नानंतर त्यांनी…”

हेमांगी कवी काय म्हणाली?

“काही दिवसांपूर्वी मला एका जाहिरातीसाठी विचारण्यात आलं. मी ऑडिशन दिली. त्यात निवडही झाली. जाहिरातीत कोण आहे, इतर तपशील मी विचारला नव्हता. शूटींगच्या दिवशी मी सेटवर जाऊन तयार झाले आणि व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसले. थोड्या वेळाने बाहेर आले तर सगळीकडे शांतता होती. इतकी शांतता का? असं मी विचारलं. तर तेव्हा मला सर येतात, असं समजलं. थोड्या वेळाने सेटवर सिक्युरिटी गार्ड दिसले. प्रोडक्शन टीममध्ये एक ओळखीची मराठी मुलगी होती आणि मी पुन्हा तिला विचारलं, तर तिनेही मला सर येतात असं उत्तर दिलं.

त्यावेळी मला वाटलं की ही जाहिरात आहे, त्याचे मालक असतील. मी पुन्हा तिला विचारलं, त्यांना झेड सिक्युरिटी असते का? त्यावर ती म्हणाली, ‘सर म्हणजे अमिताभ बच्चन!’ तिचे हे शब्द ऐकून माझा विश्वासच बसेना. मी स्तब्ध झाले आणि काही वर्षं मागे गेले. काही वर्षांपूर्वी एका जाहिरातीत मी आणि अमिताभ बच्चन असे दोघंही झळकलो. या जाहिरातीचं आम्ही एकत्र शूटींग केलंय असं प्रेक्षकांना वाटेल; पण प्रत्यक्ष तसं नव्हतं. आमचं शूटींग वेगवेगळं झालं होतं. पण तेव्हापासून त्यांना भेटण्याची, प्रत्यक्ष बघण्याची इच्छा मनात होती.

काही तांत्रिक गोष्टींमुळे अमिताभ सर बराच वेळ थांबले होते. पण सेटवर आल्यावर त्यांच्यात कोणताही थकवा जाणवत नव्हता. त्यांनी जवळजवळ पाच वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालून चित्रीकरण केलं. कपडे बदलून बरोबर दहाव्या मिनिटाला ते हजर होत होते. त्यांचा अभिनय, उत्साह, आदबशीर वागणं, वक्तशीरपणा सगळंच थक्क करणार होतं.

माझी ही इच्छा एका दुसऱ्या जाहिरातीच्या निमित्ताने पूर्ण झाली. बच्चन सरांबरोबर चित्रीकरण करण्याआधी आम्ही आमचा-आमचा सराव करत होतो. काही तांत्रिक गोष्टींचं काम सुरु असल्याने मला शूटींगसाठी वेळ लागणार असल्याचे समजले. दुपारचे ३ वाजले होते, पण तरीही शूटींगची काहीही चिन्हं दिसत नव्हती. सहदिग्दर्शकाबरोबर आम्ही परत सराव करायला सुरुवात केली आणि तोच सेटवर पुन्हा गडबड सुरू झाली. बच्चन सर शूटींगच्या ठिकाणी आले होते. मी त्यांना प्रत्यक्ष बघतेय आणि आता त्याच्याबरोबर अंतिम सराव करायचा आहे, यावर विश्वास बसत नव्हता.

अमिताभ बच्चन यांच्याबरोबर सराव करताना मी नकळत त्यांच्या संवादाला एक प्रतिक्रिया दिली. तेव्हा त्यांनी मला विचारलं, ‘तुम्ही असं करणार आहात का?’ मी थोडी घाबरले, मी तसं करायला नको का अशी शंका माझ्या मनात आली. त्यानंतर मी पुन्हा त्यांच्याबरोबर सराव केला. त्यावेळी मी आधी दिलेली प्रतिक्रिया दिली नाही. त्यात मी सहदिग्दर्शकाबरोबर जे ठरलं होतं, त्याचप्रमाणे केलं. तेव्हा अचानक बच्चन सर थांबले आणि म्हणाले, ‘तुम्ही आधी दिलेली प्रतिक्रिया दिली नाहीत? ती चांगली वाटत होती.’ त्यानंतर मग मी सहदिग्दर्शकाची परवानगी घेतली आणि त्याप्रमाणे २-४ शॉर्ट्समध्ये साधारण अर्ध्या तासात चित्रीकरण पूर्ण केलं. त्यांच्याबरोबरचा संपूर्ण वेळ स्वप्नवत होता”, असे हेमांगी कवीने सांगितले.

आणखी वाचा : “मी कधीही आरशासमोर…”, वजन कमी करण्यापूर्वी ‘अशी’ होती आरती सोळंकीची लाईफस्टाईल, म्हणाली “आता ड्रेस…”

दरम्यान हेमांगी कवीने अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त एक फोटो पोस्ट केला होता. त्यावेळी तिने एका जाहिरातीच्या निमित्ताने तिला बिग बींसोबत काम करण्याची संधी मिळाली, याबद्दल सांगितले होते. या जाहिरातीच्या शूटिंग दरम्यानचा BTS व्हिडीओही तिने शेअर केला होता.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress hemangi kavi share experience working with amitabh bachchan in advertisement nrp