अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून हेमांगी कवी धुमाळ ही नेहमीच चर्चेत असते. ती सोशल मीडियावर तिचे मत बिनधास्तपणे मांडताना दिसते. हेमांगीने नुकतंच एका मुलाखतीत तिच्यावर बालपणी झालेल्या संस्कारांबद्दल भाष्य केले. तसेच तिने तिच्या बालपणीच्या काही आठवणीही सांगितल्या.
हेमांगी कवी नुकतंच ‘प्लॅनेट मराठी’वरील ‘त्या नंतर सर्व काही बदललं’ या पॉडकास्टमध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी तिने विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी तिने तिच्या आई-वडिलांच्या शिकवणीबद्दल सांगितले.
आणखी वाचा : “तिच्यामुळे मी…” हेमांगी कवीने तब्बल २ वर्षांनी सांगितलं ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ पोस्टमागील खरं कारण
“मी आता जे काही आहे, त्याचं मूळ माझ्या घरात आहे. कारण माझे बाबा…. आमच्या घरात खूप मोकळं वातावरण होतं. माझ्या आणि माझ्या भावामध्ये त्यांनी कधीच भेदभाव केला नाही. त्या उलट त्याला सातच्या आत घरात यायला सांगितलं जायचं कारण तो थोडा तापट स्वभावाचा होता. त्याने कुठेतरी सातनंतर जाऊन राडा करु नये, म्हणून तू घरात बस, असं सांगितलं जायचं.
आमच्याकडे का विचारण्याची मुभा होती. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आजही अनेक मुलींना सांगितलं जातं, त्यावर तिने का विचारायचं नसतं. ते स्वातंत्र्य आम्हाला तेव्हापासूनच दिलं गेलं होतं.
स्लीव्हलेस घालायचे नाही, केस असे कापायचे नाहीत, असे घरातील इतर मंडळी सांगायची. कारण त्यांना वाटायचं की, हे केल्यामुळे आपल्या मुलीवर काहीतरी संकट येणार आहे. त्यामुळे ते मुलींना बंधनात ठेवायचे. पण आमच्यावर कधीच अशी बंधन घातली गेली नाही. तेव्हा आम्ही आई-वडिलांना तुम्ही आम्हाला असं बंधनात का ठेवलं नाही, असे विचारले. त्यावर त्यांनी आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे. जरी काही झालं तरी आम्ही कायम तुमच्याबरोबर असू. पाठिशी उभे राहू. तुम्ही हे चूक केलं, म्हणून आता तुम्ही तुमचं बघा, असं कधीही होऊ शकतं नाही, असे आमचे आई-वडील सांगायचे”, असे हेमांगी कवीने सांगितले.
दरम्यान हेमांगी कवी ही कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी ती ‘कलर्स मराठी’वरील ‘लेक माझी दुर्गा’ या मालिकेच्या मुख्य भूमिकेत झळकत होती. त्याबरोबरच ती ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटातही झळकली होती. तसेच तिने अनेक नाटकांमध्येही काम केलं होतं.