मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ऋता दुर्गुळेला ओळखलं जातं. ती कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. ‘फुलपाखरु’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. दुर्वा ही ऋताची पहिली मालिका होती. नुकतंच तिने एका मुलाखतीत तिला ही मालिका कशी मिळाली? याबद्दलचा खुलासा केला आहे.
ऋता दुर्गुळेचा ‘सर्किट’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यानिमिताने तिने अभिनेत्री सुरेखा तळवलकर यांच्या ‘दिल के करीब’ या चॅनलला मुलाखत दिली. यावेळी तिने तिला मला ‘दुर्वा’ ही मालिका पुढचं पाऊल या मालिकेमुळे मिळाली, असे सांगितले.
आणखी वाचा : नागराज मंजुळेंच्या ‘घर, बंदूक, बिरयानी’ आणि ‘सर्किट’ची बॉक्स ऑफिसवर टक्कर, ऋता दुर्गुळे म्हणाली “दोन्हीही चित्रपट…”
मला ‘दुर्वा’ या मालिकेची ऑफर खरतंर ‘पुढचं पाऊल’मुळे मिळाली. ‘पुढचं पाऊल’ या मालिकेत हर्षदा खानविलकर काम करत होत्या. संजय जाधव यांची आई या माझ्या आईच्या शिक्षिका होत्या. मी त्यावेळी मास मीडिया करत होते, त्यामुळे मला इंटर्नशिप कराव्या लागतात. माझी मावशी युएसमध्ये राहते, त्यामुळे मी तिथे जाणार होते. त्यावेळी माझा व्हिसा झाला नाही. तेव्हा मग मी विचार केला की मे महिन्याची सुट्टी आहे, वेळ आहे, तर किमान इंटर्नशिप करु असा मी विचार केला.
त्यावेळी आई म्हणाली की, “मी संजयशी बोलून बघते की त्याचं कुठे काय सुरु आहे का? तसंही तुला फ्लोअरवर काम करायचं, तुला यातंल काहीच माहिती नाही?” त्यांनी हर्षदा ताईला सांगितलं आणि त्या म्हणाल्या की “माझी मालिका सुरु आहे, तिला सेटवर पाठवं बघू आपण काही होतंय का?” तिथे मी वैभव चिंचाळकर, हर्षद सर यांच्या बरोबर अस्टिटंट डायरेक्टर होते. पण तेव्हा मी फक्त १० ते १५ दिवस काम केले. त्यानंतर माझा सिंगापूरचा व्हिसा झाला आणि मी मावशी-काकांबरोबर फिरायला बाहेर गेले. तिथे रसिका देवधर होत्या. तेव्हा निनाद यांची पहिली मालिका येणार होती, तिचं नाव ‘दुर्वा’ असं होतं. तिने मला यात आवड आहे का असं विचारलं होतं. तेव्हा मी तिला हो म्हटलं होतं, असा किस्सा ऋता दुर्गुळेने सांगितला.
दरम्यान ‘सर्किट’ हा ऋता दुर्गुळेचा तिसरा चित्रपट आहे. तिने आतापर्यंत अनेक नाटक, मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. ऋताने ‘दुर्वा’ या मालिकेतून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर ती ‘फुलपाखरु’ या मालिकेत झळकली. या मालिकेमुळेच ती प्रसिद्धीझोतात आली. ऋताने ‘अनन्या’ आणि ‘टाइमपास ३’ या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती.