सातत्याने विविध वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत राहिलेली अभिनेत्री म्हणून केतकी चितळेला ओळखले जाते. ती तिच्या वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असते. यामुळे अनेकदा ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. काही महिन्यांपूर्वी केतकीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. यामुळे तिला तुरुंगवास भोगावा लागला होता. यानंतर आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्ताने तिने एक पोस्ट शेअर केली आहे.
दरवर्षी २८ मे हा दिवस स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती म्हणून साजरा केला जातो. नुकतंच केतकीने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा एक फोटो पोस्ट केला आहे.
आणखी वाचा : “१० वर्षांनंतर मला तुरुंगात टाकले तेव्हा…” केतकी चितळेची ‘ती’ पोस्ट चर्चेत
केतकी चितळेची पोस्ट
“जेव्हा कागद पेन नसते, तेव्हा काही रचणे ही कल्पना मला गेल्या वर्षांपर्यंत झेपत नव्हती. पाठांतराने हे शक्य आहे हे कळायचे, पण कधी गरजच पडली नव्हती.
गेल्यावर्षी जेव्हा मला तुरुंगात टाकण्यात आले, तेव्हा फक्त सावरकरांना डोळ्यासमोर ठेवून रोज पाठांतर करीत वही-पेन मिळेपर्यंत बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवल्या. त्यांच्याकडून ही गोष्ट ही शिकायला मिळेल हे कधीच वाटले नव्हते”, अशी पोस्ट केतकी चितळेने केली आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याने केतकी चितळे ४१ दिवस तुरुंगात होती. तिची ती पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिच्या विरोधात अनेक कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटक झाल्यानंतरही ती तिच्या भूमिकेवर ठाम होती.
आणखी वाचा : Ruturaj Gaikwad Marriage : ऋतुराज गायकवाड लवकरच अडकणार विवाहबंधनात? तारीख आली समोर
तिने तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दिलेल्या मुलाखतींमध्येही तिच्यासह घडलेला प्रकार बेकायदेशीर होता असे म्हटले आहे. तरी अद्याप हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तुरुंगातून बाहेर आल्यावर केतकीने ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ अशी घोषणा दिली होती.