छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मानल्या जाणाऱ्या ‘बिग बॉस मराठीचे चौथे पर्व कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. अभिनेते किरण माने यांनी बिग बॉसच्या टॉप ५ स्पर्धकांमध्ये स्थान मिळवलं. अनेकदा ते बिग बॉसच्या घरातील विविध आठवणी ताज्या करताना दिसतात. नुकतंच त्यांनी बिग बॉस मराठीबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेते किरण माने हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर किरण माने हे आता फेसबुकवर सक्रीय झाले आहेत. टॉप ३ स्पर्धक ठरलेल्या किरण मानेंनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी काही आठवणी सांगितल्या आहेत.
आणखी वाचा : Bigg Boss Marathi 4 : “आज या किरण्याला हरण्याच्या…” किरण मानेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत

किरण मानेंची फेसबुक पोस्ट

बिगबाॅसचं घर… राखी किचनमध्ये होती. मी लिव्हींग एरीयातनं राखीला आवाज दिला, “राखीS… आज ६ डिसेंबर… जयभीम !” राखीनंही जोरदार नारा दिला, “जयभीSSSम” !
…’बिगबाॅस’मधल्या माझ्या लै लै लै नादखुळा, भन्नाट आठवणी हायेत. मैत्रीच्या… दुश्मनीच्या… शड्डू ठोकून आव्हान देत जिंकलेल्या टास्कच्या… ‘डोक्यॅलिटी’ वापरुन आखलेल्या स्ट्रॅटेजीजच्या… वादविवादांच्या… हास्यविनोदांच्या.. सुत्रसंचालन, डान्सपासून अभिनयापर्यन्त अनेक गोष्टींमध्ये ‘चमकण्याच्या’ सुद्धा. पण त्या सगळ्यात, माझ्या काळजाच्या कप्प्यात ‘स्पेशल’ स्थान आहे ते मी आणी राखी सावंतनं ज्ञानसुर्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली त्या आठवणीला !
…बिगबाॅसच्या घरात यापूर्वी कधी झाल्या नसतील अशा गोष्टी मी केल्या. रोज सकाळी तुकोबारायांचा एक अभंग सांगून दिवसाची सुरूवात करायचो. अनेक प्रसंगी गौतम बुद्ध, छ. शिवराय, फुले,शाहू,आंबेडकरांच्या आयुष्यातल्या संघर्षाची उदाहरणं द्यायचो. पण झालं असं, की काही स्पर्धकांना ते खुपू लागलं. का कुणास ठावूक पण त्यावर ते विनाकारण ऑब्जेक्शन घ्यायला लागले. भांडणं होऊ लागली. त्यांना वाटायचं मी हे कॅमेर्‍यासाठी करतोय.
….दोघातिघांनी यावरनं मला टारगेट करणं सुरू केलं. खूप वाद घातले. मी सांगत होतो की, मला खर्‍या आयुष्यात जवळून पहाणारेही सांगतील, माझ्या ‘सवयीचं’ आहे ते. या महान लोकांबद्दल वाचलेलं माझ्याच मनात पक्कं व्हावं, स्वत:लाच प्रेरणा मिळावी हा हेतू असतो माझा. अनेक ठिकाणी व्याख्यानंही देतो मी यावर. पण त्यांना ते मान्य नव्हतं. यावरून झालेल्या एका वादात विकेंडच्या चावडीवर एक भगिनी मला म्हन्ली, ‘हा स्वत:ला जोतीबा फुले समजतो.’ ! मला मनापास्नं वाईट वाटलं. वेदना झाल्या. ज्या महामानवांमुळे आपण जगात मानानं उभे आहोत, वाईट भवतालातही ‘माणूसपण’ टिकवून आहोत, त्यांचं नांव घेण्यात चुकीचं कायाय? असो. शेवटी अती झालं. कुठलाही विषय तिथेच येऊ लागल्यावर मी ते बंद केलं.
…काही काळानं राखी सावंत वाईल्ड कार्ड म्हणून घरात आली. गप्पांच्या ओघात तिला हे समजलं. ती मला म्हणाली, “माने, तुम्ही मला सांगत जा महामानवांच्या गोष्टी. मला ऐकायच्यात. कुणी काही बोललं तर मी आहे तुमच्या पाठीशी.” त्यानंतर एकदा एका सिनेमाच्या प्रमोशनला सुव्रत जोशी बिगबाॅसमध्ये आलावता.. तो ही म्हणाला, “किरण सर तुम्ही सुरूवातीला तुकोबारायांचे अभंग रोज ऐकवत होतात. खुप छान वाटायचं. हल्ली का बंद केले? आम्हाला ऐकायचे आहेत रोज.” मग मी ते सगळं पुन्हा सुरू केलं.
परवा वडगांव निंबाळकर या गांवी फुले-आंबेडकर संयुक्त जयंती उत्सवाला मी उपस्थित राहू शकलो नाही… तर आयोजकांनी माझ्याकडून या महामानवांसंबंधी माझे विचार लिखित स्वरूपात मागवून घेतले आणि त्याचं जाहीर वाचन केलं… तो व्हीडीओ पहात असताना ही आठवण जागी झाली.
मला राहून राहून वाटतं की ज्याला आयुष्यात लै भारी कायतरी करून दाखवायचंय, त्या प्रत्येकानं आपले सगळे महामानव वाचावेत, अनुभवावेत… मग तो माणूस कुठल्याबी क्षेत्रातला असूदे… तो कधीच ‘अभ्यासाला’ मागं पडणार नाही, कष्टाला कमी करणार नाही, अडीअडचणींत मागं हटणार नाही, चिकाटी सोडणार नाही, सगळ्या दुनियेनं वाळीत टाकलं तरी उगाच कुणापुढं झुकणार नाही, वाईट परिस्थितीत खचणार नाही, भेदभाव करणार नाही, गोरगरीबांची-दीनदुबळ्यांची हेटाळणी करणार नाही !
मी ‘अभिनेता’ म्हणून काम करत असताना माझ्या क्षेत्रात, माझ्या डोळ्यांनी असे अनेक प्रसंग पाहिलेत जिथे हतबल होऊन भलेभले आपला स्वाभिमान गहाण ठेवतात… अत्यंत केविलवाणी लवचिक भुमिका घेतात… मूग गिळून अन्याय सहन करतात… पण मी मात्र अशा प्रसंगातही आजवर माझा कणा ताठ ठेवू शकलोय, अन्याय झाल्यावर पेटून उठलोय, विपरीत परिस्थितीशी दोन हात करून त्यावर मात करू शकलोय ते या महामानवाच्या विचारांमुळेच !
जय शिवराय… जय जोती… जय शाहू… जय भीम !, असे किरण मानेंनी म्हटले आहे.

आणखी वाचा : “…म्हणून मला ‘पठाण’ पाहता आला नाही” किरण मानेंनी सांगितले कारण

दरम्यान किरण माने हे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहेत. त्यांनी बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातही हजेरी लावली होती. ते बिग बॉसच्या घरात टॉप ३ स्पर्धकांपैकी एक होते. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर त्यांनी साताऱ्यात जंगी मिरवणूक काढण्यात आली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress kiran mane talk about bigg boss marathi house incident nrp
Show comments