अभिनेत्री किशोरी अंबिये ९०च्या दशकापासून प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहेत. अनेक चित्रपटात त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. सध्या त्या ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या लोकप्रिय मालिकेत पाहायला मिळत आहेत. या मालिकेत त्यांनी कलाच्या आईची भूमिका साकारली आहे. याशिवाय किशोरी अंबिये ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ या मालिकेतही काम करत असून त्या ‘सत्यभामा’ या भूमिकेत दिसत आहेत. अशा लोकप्रिय किशोरी अंबिये यांची लेक देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे? हे तुम्हाला माहितीये का?
अभिनेत्री किशोरी अंबिये यांची लेक त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात काम करत आहे. तिने मराठीसह हिंदी मालिकाविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या ती ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी तिने आई किशोर अंबियेंसह एक फोटो शेअर केला होता. “आज मी जी काही आहे ती तुझ्यामुळे आहे,” असं या फोटोला तिने कॅप्शन दिलं होतं. तेव्हापासून या मायलेकी चर्चेत आल्या आहेत.
हेही वाचा – ‘लागीरं झालं जी’ फेम अभिनेत्याचं उद्योग क्षेत्रात पदार्पण, फलटणमध्ये सुरू केला स्वतःचा ‘हा’ व्यवसाय
किशोरी अंबिये यांच्या मुलीचं नाव काजल असं आहे. अभिनय क्षेत्रातील सुरुवात काजलने कॉलेजमधून केली होती. त्यानंतर तिने मालिकाविश्वात पदार्पण केलं. सध्या काजल ‘स्टार प्रवाह’च्या ‘शुभविवाह’ या मालिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेत तिने मानसीची भूमिका साकारली आहे. काजलची ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे.
याआधी काजलने ‘कुलस्वामिनी’, ‘काय घडलं त्या रात्री ?’ या मालिकेत काम केलं होतं. तसंच ती ‘धडकन’, ‘घर एक मंदिर’ या मालिकेत झळकली होती.