‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar)ने प्रमुख भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली. पाच वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या या मालिकेने काही महिन्यांपूर्वीच निरोप घेतला आहे. मात्र, विविध कारणांमुळे या मालिकेतील कलाकार हे चर्चेत राहतात. आता मधुराणी प्रभुलकरने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या करिअरविषयी वक्तव्य केले. याबरोबरच, आई कुठे काय करते आधी इतकी चांगली संधी का मिळाली नाही. याबरोबरच, माझे सबस्क्रायबर्स खूप नसतील पण माझे चाहते खूप असतील, असेही अभिनेत्रीने म्हटले आहे. आता मधुराणी प्रभुलकरने नेमकं काय म्हटले आहे, हे जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यामुळे आता किती गोंधळ निर्माण…

अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने नुकतीच मित्र म्हणे या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत पॉडकास्टच्या वाढत्या संख्येविषयी बोलताना मधुराणी प्रभुलकारने म्हटले, “पॉडकास्टचा सुळसुळाट झाला आहे. कुठल्याही गोष्टीचा सुळसुळाट झाला ना त्यातील पवित्रता हरवते. मग सगळ्यांनाच वाटायला लागतं की मला ज्ञान आहे. त्यातील सत्य किती आहे, त्यामुळे आता किती गोंधळ निर्माण झाला आहे. फक्त डाएट, न्यूट्रिशन हा विषय घेतला, त्यावर प्रत्येक पॉडकास्टमध्ये वेगळा विचार मांडला गेला आहे. सामान्य माणसाच्या डोक्याने काय करायचं. आता अध्यात्मामध्ये मला रस आहे, त्यामुळे मी ते थोडंफार बघते. पण, तेसुद्धा आता इतकं त्रासदायक होत चाललं आहे; प्रत्येक जण काहीतरी सांगू पाहतंय. पण, आपल्याला एवढी माहिती हवी आहे का? यातून आपण काय मिळवतो. एवढ्या माहितीचे आकलन करण्यासाठी आपलं मन तयार आहे का आणि गरज आहे का? आता आपल्याला त्याचंही व्यसन झालेलं आहे. एक रील दिसली की आपण स्क्रोल करत राहतो. यूट्यूब, इन्स्टाला आपल्याला कशात आवड आहे ते कळतं. एका तासानंतर कळतं की हाताला काहीच लागलेलं नाही.”

हे रीलबाबत झालं, पॉडकास्ट बाबतीतही असंच आहे का? असं विचारल्यावर अभिनेत्रीने म्हटले, “मी स्पष्टपणे सांगणार आहे. अभ्यास करून किती जण पॉडकास्ट करतात? किती जणांना त्या खुर्चीत बसून चांगले प्रश्न विचारण्याची कला आहे?”

पुढे अभिनेत्रीने म्हटले की, हे काय सगळंच ऐकण्याच्या दर्जाचं असतं असं नाही. प्रकाश आमटे, संजीव अभ्यंकर, आरतीताई, अभय बंग, राणी बंग यांना का पॉडकास्टमध्ये नाही आणत? काहीतरी खरंच सखोल करणाऱ्या लोकांची मुलाखत घेण्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो. तो करण्याची कोणाची तयारी आहे? उठायचं, तीन कॅमेरे घ्यायचे, चल पॉडकास्ट करू, अशी आज परिस्थिती आहे. मी हे केलेलं आहे. आजही लोक माझ्या मागे लागतात की कवितेचं पान का करत नाही? गेले पाच वर्षही म्हणत होते. मला असं वाटतं की, मला ते मनापासून करायचं आहे. मी कोणालाही असिस्टंट म्हणून रिसर्चला ठेवलं नाहीये. मी माझ्यासाठी करते, माझी तळमळ प्रेक्षकांना कळेल. मग भलेही सबस्क्रायबर्स खूप नसतील, पण माझे चाहते खूप असतील. मी दीर्घ काळासाठी लोकांच्या मनात घर करेन, याची मला खात्री आहे. कारण ती माझी नाही, कवितेची ताकद आहे, पण ती पोहोचवण्याची माझी तळमळ खरी आहे. यातून पैसै कमवता येतात, हे मला माहीत नव्हतं, त्यामुळे हेतू हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

याबरोबरच अभिनेत्रीने यूट्यूबर कवितेचं पान व रंगपंढरी हे दोन उपक्रम सुरू केले होते. यावर बोलताना अभिनेत्रीने म्हटले, “कवितेचं पान ही कवितांची मैफल होती. कविता हे त्याचं केंद्रस्थान होतं. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावर प्रश्न फार नसायचे. कविता तुमच्या आयुष्यात कशी आली. उदाहरणार्थ, आज आपण इंदिरा संतांवर कविता करतोय तर तुम्हाला त्यांच्या कोणत्या कविता आवडतात व का आवडतात. कवितेच्या अनुषंगाने प्रश्न असायचे. पण, त्याचा मला खूप अभ्यास करायला लागायचा. कारण कवितेचा हात मधल्या काळात सुटला. म्हणजे कविता पाठ होत्या असं नव्हतं. जत्रेत आईचा हात सुटल्यावर मूल कसं कावरं-बावरं होतं, तसं मला काही वर्ष झालं होतं की काहीतरी मिसिंग आहे आपल्या आयुष्यात आणि ते काय कळत नाही. मग जेव्हा पुन्हा एकदा कविता आयुष्यात आली, तेव्हा मला असं वाटलं की हा माझा शांततेचा कोपरा आहे, इथे मी रमते. या कविता वाचताना मला आतून आनंद मिळतो.”