‘असंभव’, ‘इश्कबाज’, ‘प्रतिमा’, ‘कुछ पल साथ तुम्हारा’, ‘सारथी’, ‘वो अपना सा’, ‘प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा’, ‘कोई अपना सा’ अशा अनेक मालिकांतून अभिनेत्री मानसी साळवी(Manasi Salvi)ने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. गेली २९ वर्षे टीव्ही इंडस्ट्रीत अभिनेत्री सातत्याने काम करताना दिसते. आता एका मुलाखतीत अभिनेत्रीने महिलांना सेटवर पुरुष सहकलाकारांकडून किंवा कर्मचाऱ्यांकडून ज्या पद्धतीची वागणूक मिळते, महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन यावर वक्तव्य केले आहे.
जास्त जवळीक झाली की, त्याचा कामावर परिणाम…
मानसी साळवीने नुकतीच ‘आरपार’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्रीने कामाच्या ठिकाणी पुरुष सहकलाकारांकडून किंवा सेटवरील इतर पुरुष सहकाऱ्यांकडून महिलांना मिळणाऱ्या वागणुकीबद्दल वक्तव्य केले. मानसी साळवीने म्हटले, “मी २१-२२ वर्षांची होते, तेव्हा मी जरा जाड होते. त्यामुळे मी जास्त करून सगळे मला बहीणच बनवायचे. देव त्यांचं भलं करो; पण असं होतं. एकदा मी शूटिंग करीत होते. एक अभिनेता होता, जो माझ्या ऑनस्क्रीन नवऱ्याची भूमिका करीत होता. सेटवर मी सहसा वेगळी बसते. कारण- जास्त जवळीक झाली की, त्याचा कामावर परिणाम होतो. नाही तर, जो परस्परांप्रति आदर असतो, तो कमी होतो आणि डेली सोप म्हणजे रोज तुम्हाला एकमेकांना बघायचं असतं. त्यामुळे थोडं अंतर असणं चांगलं आहे. तर ऑनस्क्रीन नवऱ्याची भूमिका करणारा कलाकार मला म्हणाला की, लांब का बसली आहेस? जवळ येऊन बस. थोडी केमिस्ट्री तयार केली, तर चांगले सीन करता येतील. मी त्यांना म्हटलं की, तुम्ही अभिनय केलात, तर बरं होईल. आज अभिनय करत असता, तर चित्रपटात काम करत असता; टीव्हीमध्ये काम करत नसता.”
मानसी साळवी पुढे म्हणाली, “मी बघते बरेच कलाकार असतात, जे नकारात्मक भूमिका करतात. आपल्या इंडस्ट्रीमध्ये नकारात्मक भूमिका करायची असेल, तर तुम्हाला स्पगेटी, गळा मोठा असलेले ब्लाऊज घालावे लागतात. मी निरीक्षण केलं आहे की, एखाद्या बाईनं तिच्या भूमिकेनुसार बॅक ओपन असलेला ब्लाऊज घातला असेल किंवा छोटा ड्रेस घातला असेल, तर तिथल्या पुरुषांना कधीतरी असं वाटतं की, ती महिला अॅव्हेलेबल आहे. हा अत्यंत असभ्य आणि अशिक्षित असा दृष्टिकोन आहे. तुम्हाला स्वत:च स्वत:चं संरक्षण करावं लागेल. तुमचं संरक्षण करण्यासाठी कोणीही येणार नाही. आज इंडस्ट्री तशी नाहीये. मी भाग्यशाली होते, माझ्याबरोबर माझी आई यायची, तेव्हा लोक जज करायचे नाहीत. काही लोक म्हणायचे हे बरोबर नाहीये. पण आज जर एखादी अभिनेत्री आपल्या आईला वगैरे घेऊन आली, तर तिच्याकडे असं बघितलं जाईल की, मग या इंडस्ट्रीमध्ये येऊच नका. काही मुलींना बघते की, त्यांना माहितेय की कधी आणि कुठे रेषा आखायची आहे, मला त्यांचं कौतुक वाटतं.
“मला वाटतं सेटवर स्वत:चं संरक्षण करणं. तुम्ही कसं वावरता, तुम्ही कसं बोलता, कोणाच्या खांद्यावर हात ठेवून बोलता की कोणाच्या कमरेत हात घालून बोलता. तुमची बॉडी लॅग्वेंज काय आहे, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या स्पेसमध्ये एक अंतर ठेवणं गरजेचं आहे. ही कायम एक लढाई असणार आहे. कारण- लोक तुमच्या त्या स्पेसमध्ये शिरण्याचा प्रयत्न करणार. पण, आपल्याला ते कळलं पाहिजे की, कोणाला किती शिरू द्यायचं आणि कोणाला किती दूर ठेवायचं आहे.”
“काही बायका धडाही शिकवतात. फक्त कलाकारच नाहीत, इतरही हेअर स्टायलिस्ट किंवा इतर काही महिला कर्मचारी असतात. त्यांनासुद्धा त्यांच्या पातळीवर छळाला सामोरं जावं लागतं. त्यांच्यात जितकी एकता असते, तितकी एकता महिला कलाकारांमध्ये नसते. महिला कलाकारांमध्ये कधी कधी असं होतं की, तिच्या वतीनं मी कशाला बोलू? मग मी वाईट दिसेन; पण ते एकमेकांना संरक्षण देतात. मी नेहमी म्हणते की, बाईचा सर्वांत जास्त छळ बाईच करते आणि पुरुष बाईचा छळ तेव्हा करू शकतो, जेव्हा त्याला एक बाई सामील असते. जेव्हा दोन महिला एकत्र येतात, तेव्हा हे शक्य होत नाही.”