‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री मेघा धाडेने बुधवारी(१४ जून) भारतीय जनता पार्टीत प्रवेश करुन राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थिती मेघाने भाजपात प्रवेश केला. यावेळी भाजपाच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रदेशाध्यक्षा अभिनेत्री प्रिया बेर्डेही उपस्थित होत्या.
भाजपात प्रवेश केल्यानंतर मेघाने इट्स मज्जा या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने राजकारणात प्रवेश करण्याबाबत भाष्य केलं. “ज्या पक्षाच्या विचारधारेशी माझी विचारधारा जुळली, त्याच पक्षात मी प्रवेश केला. त्यामुळे मी आनंदी आहे. या समाजाप्रती आपली काहीतरी जबाबदारी आहे. समाजातील प्रत्येक गोष्टीला, समस्यांना दोष देत बसण्यापेक्षा समोर येऊन आपण काम केलं पाहिजे. त्या गोष्टी सुधारवण्याचा प्रयत्न केला पाहिजे,” असं ती म्हणाली.
पुढे ती म्हणाली, “कलाकारांचा लोकांवर जनमाणसांवर प्रभाव असतो. चांगल्या गोष्टीसाठी, चांगल्या कामासाठी हा प्रभाव पडला, तर खूप छान होईल. फक्त हिरोइनसारखं न वागता, आपण समाजाचं देणं लागतो. त्याची परतफेड कशी करता येईल, हे सांगण्याची ही वेळ आहे. भारत लवकरच महासत्ता होणार आहे. हे सोनेरी स्वप्न पूर्ण होताना आपलाही त्यात खारीचा वाटा असला पाहिजे. त्यामुळे जाणीवपूर्वक मी हे पाऊल उचललं आहे.”
“राजकारण हे माझ्यासाठी करिअर नसून जबाबदारी आहे. यात फक्त ५ टक्के राजकारण बाकी ९५ टक्के समाजकारण असेल. भाजपा हा अथांग समुद्र आहे. जगातील सगळ्यात मोठा पक्ष आहे. या महासागरातील एक छोटाशा थेंब मी झाले आहे. फक्त चित्रपटसृष्टीतील कलाकारांसाठी नाही तर कला क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्याच लोकांसाठी आम्ही काम करणार आहोत. कला क्षेत्रात आणखी संधी उपलब्ध करुन देण्यासाठी आणि या क्षेत्रातील लोकांच्या मेडिकल हेल्थसाठी आम्ही काम करणार आहोत,” असंही पुढे ती म्हणाली.