सोशल मीडिया हे असे माध्यम आहे, ज्याचा उपयोग सामान्यांपासून ते सर्वांत श्रीमंत व प्रसिद्ध व्यक्तीपर्यंत सर्व जण करतात. मनोरंजनसृष्टीतील कलाकारही या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतात. फोटो, व्हिडीओ, त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण, नवीन चित्रपट अशा अनेक गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचतात. अनेकदा या कलाकारांना ट्रोलदेखील केले जाते. आता मराठी अभिनेत्री मीरा जगन्नाथ(Mira Jagannath)ने यावर वक्तव्य केले आहे.

अभिनेत्री मीरा जगन्नाथने नुकतीच ‘सुमन म्युझिक मराठी’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिला सोशल मीडियावरील ट्रोलिंगबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना अभिनेत्रीने म्हटले, “माझ्याबद्दल खूप बोललं जातं. खूप वेळा ते ऐकून मला इतका त्रास होतो की, ते ऐकून मी रडते, हे कोणाला माहीत नाही. फोटोंवर घाण कमेंट्स केले जातात. तुम्ही एक कमेंट करून जाता. पण, तिथे हजारो, लाखो लोक आम्हाला फॉलो करीत असतात. त्या कमेंट्स वाचून, अजून १०-१५ लोकांची कमेंट्स करण्याची हिंमत होते. कुटुंब बघत असते, ते सगळं ठीक आहे. इंडस्ट्रीमध्ये आलात, तर तुम्हाला या सगळ्याचा सामना करावा लागेल. कोणालाही आपण शांत करू शकत नाही. पण, मला असं वाटतं की, जे अशा प्रकारच्या कमेंट्स करतात, त्यांनी थोडा विचार करायला पाहिजे.

मला असं वाटतं की, स्त्रियांना त्रास होतो, जो त्या सांगू शकत नाहीत. आपल्या हातात असतं की, आपण त्या कमेंट्स डिलीट करू शकतो. पण, किती करणार? तुमच्या मनामध्ये त्या व्यक्तीबदद्ल काय भावना आहेत, हे तर काढूच शकत नाही. त्यामुळे ज्या नवीन मुली इंडस्ट्री येतात, त्यांच्यावर बंधनं घातली जातात की, या भूमिका करायच्या नाहीत, असे कपडे घालायचे नाहीत. मी बाहेर खूप नॉर्मल राहते. पण, जेव्हा मी कॅमेऱ्यासमोर येते तेव्हा माझे व्यक्तिमत्त्व बदलते.

“इलू इलू १९९८ च्या प्रीमियरवेळी मी जी साडी नेसली होती, त्यावरून मला खूप ट्रोल करण्यात आलं. मराठी असून असे कपडे घालते, अशा कमेंट्स होत्या. मराठी लोक हिंदीमध्ये जाऊन असे कपडे घालतात तेव्हा तुम्हाला काही वाटत नाही. त्यावेळी ती व्यक्ती मराठीच असते ना? फक्त भाषा बदलते. त्यामुळे लोकांनी यामध्ये बदल करायला हवा.”

तुम्ही यासाठी आम्हा मुलींना….

पुढे मीराने म्हटले, “मी येऊ कशी मी नांदायला या मालिकेत काम करत होते. त्यावेळी मी एक फोटो शूट केलं होतं. त्या फोटोंवर लोकांनी कमेंटस केल्या होत्या. त्या फोटोंवर “म्हणूनच बलात्कार होतात आणि बलात्कार झाल्यानंतर तुम्ही बोलू नका की आम्ही असे फोटो टाकले म्हणून…” अशा आशयाच्या कमेंटस होत्या. मला कळलंच नाही की, त्या माणसाला नेमकं काय म्हणायचं आहे. मी म्हटलं की, असा फोटो टाकल्यानं लोकांना बलात्कार करण्याची इच्छा होते? आणि तुम्ही यासाठी आम्हा मुलींना दोष देताय? मला कीव आली. मी कधीच मला किती कमेंट्स आल्या तरी इतर कुठे त्याबद्दल व्यक्त होत नाही. पण, त्यावेळेस मी त्या कमेंटचा स्क्रीनशॉट काढला. मी त्या माणसाला टॅग केलं. बाकीही काही लोकांना टॅग केलं आणि विचारलं की, हे किती बरोबर आहे आणि किती चुकीचं आहे. मी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार केली. ही एक प्रकारची धमकीच होती.”

“स्क्रीनवर मी असे कपडे घालते. रोजच्या आयुष्यात असे कपडे घालत नाही. कारण- मला भीती वाटते की, मी सुरक्षित आहे की नाही. मुंबईत सुरक्षित वाटतं. पण, आपल्याला आपली काळजी घ्यायला हवी, इतकंच मला वाटतं.”

दरम्यान, अभिनेत्रीने या मुलाखतीत अनेकविध विषयांवर वक्तव्य केले आहे. तिचे स्कीन केअर रूटिन काय आहे, फिटनेस मंत्रा काय आहे यावर मीराने वक्तव्य केले आहे.

Story img Loader