हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनेता अमेय वाघ, राजसी भावे, सिद्धार्थ चांदेकर, मिताली मयेकर, क्षिती जोग, हरीश दुधाडे, निवेदिता सराफ, राजन भिसे असे तगडे कलाकार मंडळी असलेला ‘फसक्लास दाभाडे’ २४ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सध्या चित्रपटाची टीम ठिकठिकाणी प्रमोशनसाठी जाताना दिसत आहे. ‘आता होऊ दे धिंगाणा ३’मध्ये ‘फसक्लास दाभाडे’तील कलाकार उपस्थित राहिले होते. यावेळी कलाकारांनी धमाल केलेली पाहायला मिळत आहे.
‘आता होऊ दे धिंगाणा ३’च्या आगामी भागात ‘फसक्लास दाभाडे’मधील अमेय वाघ, क्षिती जोग, हेमंत ढोमे, राजसी भावे आणि मिताली मयेकर पाहायला मिळणार आहे. याचा नुकताच एक प्रोमो ‘स्टार प्रवाह’च्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये मिताली ‘साडे माडे शिंतोडे’ खेळ खेळताना दिसत आहे.
‘साडे माडे शिंतोडे’ खेळात मितालीला तिचा नवरा सिद्धार्थ चांदेकर आणि तेजश्री प्रधानचं ‘सांग ना रे मना’ गाण्यातील एका कडव्यातील काही शब्द ओळखायचे होते. पण मितालीला गाणं येत नव्हतं. त्यामुळे ती एकही शब्द ओळखू शकली नाही. शेवटी म्हणाली, “अरे मला हे काही येत नाही. मी सांगत होते. अमेय हे तुझ्यामुळे झालं आहे.” त्यानंतर सिद्धार्थ जाधव म्हणाला, “हे तुझ्या नवऱ्याचं गाणं आहे. तुझा नवरा हा भाग बघणार आहे.” तेव्हा मिताली म्हणाली की, आता घरी जाऊन फटके. त्यावर सिद्धार्थ म्हणाला, ‘भाबडा आहे बिचारा.” मितालीचा हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आला आहे.
दरम्यान, मिताली मयेकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती पहिल्यांदाच सिद्धार्थबरोबर ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटात दिसणार आहे. त्यामुळे दोघांचे चाहते खूप उत्सुक आहेत. याआधी मितालीने बऱ्याच चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे.