Marathi Actress Blessed With Baby Boy : लग्नानंतर अनेक अभिनेत्री करिअरला ब्रेक देऊन आपलं वैयक्तिक आयुष्य तसेच संसार व घर सांभाळण्यास प्राधान्य देत असल्याचं आपण पाहिलं आहे. याशिवाय बॉलीवूडपासून ते मराठी इंडस्ट्रीपर्यंतच्या काही अभिनेत्री गेल्या काही वर्षांत लग्नानंतर विदेशात स्थायिक झाल्या आहेत.
मराठी मालिकांमधून घराघरांत लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री नेहा गद्रेने सुद्धा काही वर्षांपूर्वीच इंडस्ट्री सोडून परदेशी राहण्याचा निर्णय घेतला. यानुसार, नेहा सध्या आपल्या पतीसह ऑस्ट्रेलियात असते.
‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘अजूनही चांद रात आहे’ या मालिकांमुळे आणि ‘मोकळा श्वास’ या चित्रपटामुळे नेहाला एक वेगळी ओळख मिळाली होती. परंतु, सध्या ती अभिनयापासून दूर आहे. वैयक्तिक आयुष्यात २ मार्च २०१९ मध्ये तिने ईशान बापटशी विवाह केला. सध्या ते दोघेही ऑस्ट्रेलियात राहतात. काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनाऱ्यावर बेबी बंपसह फोटो शूट करत नेहाने आई होणार असल्याची गोड बातमी सर्वांना दिली होती. याशिवाय तिने जेंडर रिव्हिल सुद्धा केलं होतं.
बाळाच्या जन्माआधी लिंग चाचणी करणं भारतात बेकायदेशीर आहे पण, विदेशात याला परवानगी आहे. त्यामुळे नेहाला आधीच मुलगा होणार की मुलगी हे समजलं होतं. जेंडल रिव्हिल केल्यावर नेहाला तिला मुलगा होणार असल्याची बातमी मिळाली. अभिनेत्रीने १० फेब्रुवारीला बाळाचं स्वागत केलं. यानंतर आज सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नेहाने आई झाल्याची आनंदाची बातमी सर्वांना दिली आहे. या पोस्टमध्ये नेहाने तिच्या बाळाचं नाव देखील सर्वांना सांगितलं आहे.

नेहा गद्रेने तिच्या बाळाचं नाव इवान असं ठेवलं आहे. “वेलकम टू द वर्ल्ड बेबी इवान” अशी पोस्ट शेअर करत नेहाने ही आनंदाची बातमी तिच्या सर्व चाहत्यांना दिली आहे. स्वानंदी बेर्डे, सुकन्या मोने या अभिनेत्रींनी सुद्धा नेहाच्या पोस्टवर कमेंट करत तिचं अभिनंदन केलं आहे.