१९ फेब्रुवारीला देशाचे आराध्यदैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५वी जयंती साजरी करण्यात आली. संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने शिवजयंती साजरी केली. यानिमित्ताने मराठी कलाकार मंडळींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात झळकलेल्या नेहा शितोळेने अनोख्या अंदाजात शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. तिने पोस्टमधून स्वतःचं परखड मत मांडत शिवरायांकडे आधुनिक मावळ्यांना सुबुद्धी देण्याची प्रार्थना केली. या पोस्टमुळे नेहा शितोळे सध्या चर्चेत आली असून तिला ट्रोल केलं जात आहे. एका नेटकऱ्याने तर तिला थेट शाप दिला आहे. या नेटकऱ्याच्या प्रतिक्रियेवर नेहा काय म्हणाली? जाणून घ्या…
अभिनेत्री नेहा शितोळेने शिवजयंतीनिमित्ताने लिहिलं की, एरवी समाजाला पोषक आणि उपयुक्त अशी एकही कौतुकास्पद गोष्ट हातून न घडलेल्या पण आज फेटे बांधून, नऊवारी साडी नेसून, लायकी नसनाताही कपाळावर चंद्रकोर मिरवत आणि छत्रपतींचा वारसा ( ओरडत, ओरबाडत ) नुसत्या घोषणा देत, गाडीचे आणि हॉनचे कर्कश्य आवाज करत, मध्यरात्री नंग्या तलवारी रस्त्यावरून घासत ठिणग्या उडवून त्यांची आणि महाराजांच्या कीर्तीची धार बोथट करणाऱ्या सर्व आधुनिक मावळ्यांना सुबुद्धी लाभो हीच छत्रपती शिवरायांचरणी प्रार्थना.
नेहाची ही पोस्ट वाचून अनेक चाहत्यांनी तिच्या मताशी सहमती दर्शवली. तर काही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. यामधील एका नेटकऱ्याने नेहाला थेट नवरा दुसरं लग्न करेल असाच शाप दिला. याचा स्क्रीनशॉर्ट नेहाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.
नेहाच्या पोस्टवर नेटकरी प्रतिक्रिया देत म्हणाला, “माझी कमेंट डिलीट का केली? शाप आहे माझा, तुझा चढता काळ कधीच येणार नाही. तू तणावात राहशील, नचिकेत दुसरं लग्न करेल. बघ तू” या प्रतिक्रियेचा स्क्रीनशॉर्ट शेअर करत नेहाने लिहिलं की, माझ्या कालच्या वक्तव्यावर चांगल्या वाईट प्रतिक्रिया येणार हे माहिती होतं. त्याचाच एक नमुना…ट्रोल करणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करावं हे सल्ले खूप मित्र, आप्तेष्ट आणि हितचिंतक देतात जे योग्य सुद्धा आहे. म्हणून या महाशयाची कमेंट मी डिलिट केली. पण यांना ब्लॉक करायला विसरले. हा शाप मला लागेल का खरंच? आता यांना रिपोर्ट करणं आलं.

दरम्यान, नेहा शितोळेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने नाटक, मालिका, चित्रपट, वेब सीरिज या चारही माध्यमांमध्ये काम केलं आहे. मराठीसह हिंदीतही तिने आपल्या दमदार अभिनयाची छाप उमटवली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात नेहाने खिलाडूवृत्ती अनेकांची मनं जिंकली. त्यामुळे ती अजून प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. सध्या नेहा ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘अशोक मामा’ मालिकेत पाहायला मिळत आहे.