Nishigandha Wad : मराठी, हिंदी सिनेसृष्टी आणि मालिकाविश्वात आपल्या सहजसुंदर अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या निशिगंधा वाड यांच्याबाबत चिंताजनक वृत्त समोर आलं आहे. ‘कलर्स टीव्ही’वरील ‘सुमन इंदोरी’ या हिंदी मालिकेच्या सेटवर अभिनेत्री निशिगंधा वाड यांचा अपघात झाला आहे. यामुळे मालिकेतील इतर कलाकारांसह क्रूला धक्का बसला आहे. मालिकेतील एका सीनच्या चित्रीकरणादरम्यान निशिगंधा वाड घसरून पडल्या. त्यामुळे त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. तातडीने निशिगंधा वाड यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
‘टाइम नाउ’च्या वृत्तानुसार, अभिनेत्री निशिगंधा वाड यांची प्रकृती आता स्थिर आहे. डॉक्टरांनी त्यांना काही दिवसांसाठी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. तसंच या घटनेनंतर ‘सुमन इंदोरी’ मालिकेच्या प्रॉडक्शन टीमने सुरक्षेच्या कारणास्तव आणि खबरदारीचा उपाय म्हणून चित्रीकरण तात्पुरतं थांबवलं आहे.
निशिगंधा वाड यांच्या अपघाताबाबत प्रॉडक्शन टीममधील एका व्यक्तीने सांगितलं की, हा अनपेक्षित अपघात होता. निशिगंधा मॅडम धोक्याबाहेर असल्यामुळे आम्हाला दिलासा मिळाला आहे. त्या एक फायटर आहेत. त्याच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होण्यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. याशिवाय प्रॉडक्शनकडून चाहत्यांना एक आश्वासन देण्यात आलं आहे. भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी सुरक्षा प्रोटोकॉलची अंमलबजावणी केली जाईल.
हेही वाचा – ‘इंद्रायणी’ मालिकेत झळकल्यानंतर मुक्ता बर्वेची खास पोस्ट, म्हणाली, “कितीतरी दिवसांनी…”
दरम्यान, ९०च्या दशकापासून अभिनेत्री निशिगंधा वाड प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहेत. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी आणि मालिकाविश्वात त्या एक नावाजलेल्या अभिनेत्री आहेत. ‘ससुराल सिमर का’, ‘मेरी गुडिया ‘, ‘कभी कभी इत्तेफाक’, ‘रब से है दुआ’ अशा अनेक लोकप्रिय हिंदी मालिकेत त्यांनी महत्त्वाच्या भूमिका निभावल्या आहेत. निशिगंधा यांच्या अपघाताविषयी ऐकताच चाहत्यांना धक्का बसला आहे. त्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.