‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्यात यावर्षी ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा सन्मान करण्यात आला. विविध मालिका, चित्रपट, नाटक यांच्या माध्यमातून गेली वर्षानुवर्षे निवेदिता सराफ रसिक प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहेत. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रवासात त्यांनी आपल्या घराची जबाबदारी सुद्धा उत्तमप्रकारे सांभाळली. घर-संसार याकडे लक्ष देऊन त्यांनी मोठ्या जबाबदारीने आपलं करिअर सुद्धा घडवलं. या सगळ्या प्रवासात निवेदिता अशोक सराफ यांच्या पाठीशी सुद्धा नेहमीच खंबीरपणे उभ्या राहिल्या.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने खास परफॉर्मन्स सादर करत या ज्येष्ठ अभिनेत्रीला मानवंदना दिली. निवेदिता यांच्या चित्रपटांतील लोकप्रिय गाण्यावर सोनालीने नृत्याविष्कार सादर केला. यानंतर निवेदिता यांना मंचावर आमंत्रित करण्यात आलं. यावेळी त्या प्रचंड भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर जाण्याआधी निवेदिता सराफ यांनी पाया पडून पती अशोक सराफ व अभिनेते सचिन पिळगांवकर यांचे आशीर्वाद घेतले. यानंतर अशोक सराफ यांनी देखील पत्नीला दोन्ही हात जोडून नमस्कार केला. संसार आणि करिअर दोन्ही गोष्टी जबाबदारीने सांभाळल्याबद्दल तिचे आभार मानले.
निवेदिता सराफ म्हणाल्या, “अशोक तू मंचावर आल्याशिवाय मी हा पुरस्कार स्वीकारू शकत नाही… आता मी खूप भावनिक झालेय… खरंतर, हा माझ्या माहेरचा पुरस्कार आहे असं म्हणायला हरकत नाही कारण, ‘झी मराठी’शी माझं खूप जवळचं नातं आहे. दहाव्या वर्षापासून मी चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. ‘परिवर्तन’ असं त्या चित्रपटाचं नाव होतं. तिथून आतापर्यंतचा प्रवास हा माझ्या एकटीचा नाहीये. हा प्रवास लेखक, दिग्दर्शक, माझे सहकलाकार, तंत्रज्ञ यांच्या साथीने पूर्ण झालाय. हा पुरस्कार मी या सगळ्यांच्या वतीने स्वीकारतेय. त्यातले खूप मोठे माझे हिरो आणि दिग्दर्शक महेश कोठारे इथे आहेत… त्याचबरोबर माझा दुसरा दिग्दर्शक, माझा भाऊ, माझा दीर आणि माझा बालमित्र अशी वेगवेगळी नाती असलेला सचिन. यानंतर माझी सोलमेट, मला असं वाटतं आमचं नातं अनेक जन्मांचं आहे अशी माझी सुप्रिया… या दोघांच्या हस्ते मला हा पुरस्कार मिळतोय यासाठी मी ‘झी मराठी’ची खूप आभारी आहे.”
लाडक्या मैत्रिणीचं कौतुक करत सुप्रिया पिळगांवकर यावेळी म्हणाल्या, “झी चित्र गौरवने जी हिला मानवंदना दिली…यातले सगळे टप्पे आम्ही दोघींनी एकत्र अनुभवले आहेत. तिच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. आजच्या घडीला म्हणजेच सोहळ्याच्या २५ व्या वर्षी निवेदिता सराफला जीवनगौरव मिळणं हे एक मैत्रीण म्हणून माझ्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. अभिनंदन”
दरम्यान, निवेदिता सराफ यांना पुरस्कार प्रदान करताच संपूर्ण कलाविश्वातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. त्यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर नुकत्याच त्या हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’ सिनेमात झळकल्या होत्या.